वारसदार
-------------
रशियाच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर पार पडली आणि अपेक्षेप्रमाणे व्लादिमीर पुतीन यांचे वारसदार म्हणून डिमिट्री मेडवेदेव सुमारे सत्तर टक्के मते मिळवून विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. रशियाच्या घटनेनुसार एका व्यक्तीला दोनपेक्षा अधिक वेळा अध्यक्षपद भूषविता येत नाही. त्यामुळे पुतीन यांनी बाजूला होतानाही संपूर्ण देशाची सूत्रे आपल्याच "शिष्याच्या' हातात राहतील, याची व्यवस्था केली असे बोलले जात आहे. अर्थात मेडवेदेव यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द पुतीन यांच्याच मार्गदर्शनाखाली घडली आहे. त्यांच्याच छायेमध्ये गेली वीस वर्षे ते रशियासारख्या साम्यवादी देशामध्ये राजकारण करीत आहेत. रशियाच्या अध्यक्षपदासाठी त्यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा संपूर्ण जगाला पुतीन यांच्या विश्वासातील एक माणूस एवढीच त्यांची ओळख होती; पण प्रत्यक्षात मात्र मेडवेदेव त्याही पलीकडचे आहेत. हुशार विद्यार्थी, विद्यार्थिप्रिय शिक्षक, आपल्या शहराची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी वेळप्रसंगी जुगारासारख्या माध्यमाचा आधार घेणारा धोरणी राजकारणी, स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीबाबत कमालीचा जागरूक असलेला खेळाडू आणि पाश्चात्त्य संगीताने वेडा होणारा रशियन अशी त्यांची अनेक रूपे आहेत.
मेडवेदेव यांचा जन्म लेनिनग्राडमधील कुपचिनो या गावातील. वडील शिक्षक असल्याने पहिल्यापासून त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत ते सजग होते. कम्युनिस्ट राजवटीच्या पोलादी पडद्यामध्ये असलेल्या तत्कालीन रशियातील सामान्य मध्यमवर्गीय मुलाच्या नशिबात असलेले शाळा आणि महाविद्यालयातील सरळमार्गी जीवन मेडवेदेव यांनीही अनुभवले आहे. कायद्याची पदवी घ्यायची हे ध्येय असलेल्या मेडवेदेव यांनी लेनिनग्राड विद्यापीठामधून 1987 मध्ये म्हणजेच वयाच्या 22 व्या वर्षी कायद्याची पदवी मिळविली. आज रशियाच्या राजकारणात आघाडीवर असलेले अनेक जण त्यांचे या महाविद्यालयातील सहकारी. शालेय जीवनामध्ये प्रचंड हुशार असलेला हा विद्यार्थी कायद्याच्या क्षेत्रात मोठे नाव मिळविणार असाच अंदाज त्यांचे शिक्षक व्यक्त करीत असत. पदवीनंतर पुढील तीन वर्षांमध्ये त्यांनी आपली प्रायव्हेट लॉ या विषयामधील आपली डॉक्टरेट पूर्ण केली. याच काळात अनातोल सोबचॅक यांच्याशी त्यांचा संपर्क आला. सोबचॅक कायद्याचे शिक्षक होतेच, पण स्थानिक राजकारणामध्येही त्यांना मोठा रस होता. त्यामुळेच 1990च्या सेंट पीटसबर्गच्या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये सोबचॅक यांच्यासाठी मेडवेदेव ते प्रत्यक्ष राजकारणात उतरले. त्यापाठोपाठ लेनिनग्राडच्या निवडणुकांमध्येही ते स्वयंसेवक होते. अर्थात त्याही वेळेस आपण आपली कारकीर्द राजकारणात करावी, असा त्यांचा इरादा नव्हता. आपल्याच महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी काम करायलाही प्रारंभ केला. पुढील नऊ वर्षे ते प्राध्यापक म्हणून काम करीत होते.
याच काळात ते पुतीन यांच्या संपर्कात आले. सेंट पीटसबर्गच्या महापौर कार्यालयाचे प्रमुख म्हणून काम पाहत असलेल्या पुतीन यांचा मेडवेदव यांच्याबाबत विश्वास वाटू लागला आणि एकापाठोपाठ एक कामगिरी ते त्यांच्यावर सोपवत गेले. मेडवेदेव यांचा समावेश असलेली समिती याच काळात वादग्रस्त ठरली. शहराचे उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांनी जुगाराला मान्यता देऊन त्या उद्योगामध्ये सरकारी भागीदारीचा घेतलेला निर्णय खूप वादग्रस्त ठरला होता. त्यावर मेडवेदेव यांचे उत्तर होते ते म्हणजे सरकारने यामध्ये थेट पैसे गुंतविलेले नाहीत, तर जुगारासाठी असलेल्या जागांचे भाडे वसूल करण्याचे अधिकार विकून ही भागीदारी मिळविण्यात आली आहे. त्यांचे हे उत्तरही वादग्रस्त ठरले. मुळात कम्युनिस्ट राजवटीच्या पोलादी पडद्यातून बाहेर पडत असलेल्या रशियाला सरकारने एखाद्या व्यवसायामध्ये अशा पद्धतीने भागीदारी करणे हेच नवीन होते. त्यामुळे मेडवेदेव चर्चेत आले ते आजपर्यंत त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही.
1999मध्ये पुतीन यांनी मॉस्कोमध्ये सूत्रे स्वीकारली. पुतीन यांनी आपल्या काही विश्वासू समर्थकांना मॉस्कोमध्ये आणले, त्यात मेडवेदेव यांचाही समावेश होता. 2000च्या निवडणुकीमध्ये मेडवेदेव यांनी पुतीन यांच्या प्रचारयंत्रणेचे प्रमुख म्हणून काम पाहिले. 2003मध्ये ते राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे चीफ ऑफ स्टाफ झाले तर 2005मध्ये पुतीन यांनी त्यांची उपराष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती करून अप्रत्यक्षपणे आपला वारसदार कोण असेल, हेच जाहीर केले.
या सर्व राजकीय धुमश्चक्रीमध्ये मेडवेदेव यांनी आपल्या काही गोष्टी मात्र मनापासून जपल्या आहेत. दररोज सकाळी आणि संध्याकाळी एक तास व्यायाम करण्यामध्ये गेल्या अनेक वर्षांत त्यांनी खंड पडून दिलेला नाही. पोहणे आणि जिममध्ये कसरत करणे त्यांना आवडते. दिवसामध्ये किमान एक मैल पोहण्याचा दंडक ते पाळतात. कायद्यावरील त्यांनी लिहिलेली पुस्तके अजूनही विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमामध्ये शिकविली जातात. त्यांच्या आवृत्ती प्रसिद्ध होतात. रॉक संगीताची आवडही त्यांनी जपली आहे. या संगीताच्या अनेक कॅसेट त्यांच्या संग्रहात आहेत. फुटबॉलची आवड त्यांनी जपली आहे. आपल्या गावातील फुटबॉलचा संघ चालण्यासाठी ते अजूनही मदत करतात. आपल्या कार्यालयामध्ये ते मासे आणि मांजरे पाळतात. त्याबद्दलही त्यांच्यावर टीका होते.
सात मे रोजी मेडवेदेव रशियाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. पुतीन यांच्याशी असलेले त्यांचे नाते पाहता, रशिया पुतीन यांनी दाखविलेल्या वाटेवरच वाटचाल करीत राहणार, हे स्पष्ट आहे.
-----------
पराग करंदीकर
parag.karandikar@esakal.com
Sunday, March 30, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment