Sunday, March 30, 2008

द्रष्टा उद्योजक - रतन टाटा

भारतीयांसाठी एक लाख रुपयांमध्ये मोटार देण्याच्या स्वप्नपूर्तीपाठोपाठ जॅग्वार आणि लॅंडरोव्हर हे सर्वांत महागडे "ब्रॅंड' खरेदी करून रतन टाटा यांनी सर्वच जगाला आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. जगातील सर्वांत महाग आणि सर्वांत स्वस्त अशा दोन्ही मोटारींवर यापुढे "टाटा' हाच शिक्का दिसणार आहे. या सर्वांचे श्रेय जाते ते रतन टाटा यांच्या "व्हिजनरी' नेतृत्वाला! आज भारतातील सर्वांत मोठ्या उद्योगसमूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहाची धुरा गेली अठरा वर्षे समर्थपणे सांभाळणाऱ्या रतन टाटा यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा जागतिक बाजारात भारताची पत वधारल्याचे दाखवून दिले आहे.
रतन टाटा चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले, हे खरे असले, तरीही त्यांचे बालपण मात्र अतिशय अवघड परिस्थितीमध्ये गेले. अवघ्या सहा वर्षांचे वय असताना, त्यांचे आई-वडील विभक्त झाले आणि रतन टाटा व त्यांच्या भावाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या आजीवर येऊन पडली. त्यांच्या वडिलांनी आपला राहता बंगलाही विकून टाकला. त्याच ठिकाणी आज स्टर्लिंग सेंटर आणि डॉईश बॅंकेची इमारत उभी आहे. परिस्थिती सुधारल्यानंतरही रतन टाटा अजूनही आपल्या फ्लॅटमध्येच राहणे पसंत करतात, त्यामध्ये कोठेतरी हा बंगला गमाविल्याची सल आहे.
चॅम्पियन स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्‍ट होण्याची मनीषा बाळगून रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले. आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे, या ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले. कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही घेतली. याच काळात टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जे. आर. डी. टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली. टाटा समूहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी टाटांचा नातू अशा पद्धतीने धडपड करतो आहे हे पाहून जे. आर. डी. प्रभावित झाले. आजीची तब्येत बिघडल्यामुळे तिला भेटायला भारतात आलेल्या रतन यांना जे. आर. डी. यांनी टाटा उद्योगसमूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. 1962 च्या डिसेंबर महिन्यात रतन टाटा समूहात दाखल झाले; मात्र समूहाच्या परंपरेनुसार 62 ते 71 त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच 1971 मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली.
नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती. रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळविले. संपूर्ण बाजारपेठेतील नेल्कोचा हिस्सा दोन टक्‍क्‍यांवरून वीस टक्के झाला; पण देशात आणीबाणी जाहीर झाली. पाठोपाठ आलेल्या मंदीमध्ये नेल्कोला आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि ही कंपनी बंद पडली. रतन टाटा यांना अनुभवाला आलेले ते पहिले अपयश होते. 1977 मध्ये रतन टाटांवर एम्प्रेस मिल या टाटा समूहातील बंद पडावयास आलेल्या मिलची जबाबदारी सोपविण्यात आली. एम्प्रेस मिलच्या यंत्रसामग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती. कामगारांची संख्याही मोठी आणि त्याच्या तुलनेत उत्पादन तूटपुंजे असे चित्र असलेल्या या मिलमध्ये पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची विनंती रतन टाटा यांनी टाटा उद्योगसमूहाला केली; पण नानी पालखीवाला, अजित केरकर आणि रुसी मोदी या संचालकांनी त्याला विरोध केल्याने अखेर ही मिलही बंद करण्यात आली. रतन टाटांच्या नावावर दुसरे अपयश जमा झाले. या सर्व प्रकारामुळे रतन टाटा चांगलेच दुखावले गेले होते; पण त्याचबरोबर अनुभवाच्या शाळेमध्ये बरेच काही शिकले होते. 1981 मध्ये जे. आर. डी. टाटा यांनी त्यांच्याकडे टाटा इंडस्टीजची सूत्रे सोपविली होती. त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योगसमूहाचे भावी प्रमुख असणार हे स्पष्ट झाले होते. 1991 मध्ये जे. आर. डी. यांनी स्वतःच उद्योगसमूहाची सर्व सूत्रे रतन टाटांकडे सोपवून निवृत्ती पत्करली.
उद्योगसमूहाची सूत्रे हातात आल्यानंतर टाटा यांनी अनेक ठिकाणची सूत्रे तरुण व्यवस्थापकांच्या हातात दिली. त्यांना विरोध करणाऱ्या संचालकांना सोडचिठ्ठी दिली. त्या वेळेस टाटा हा उद्योगसमूह संपविणार असल्याची टीकाही त्यांच्यावर झाली. इंडिकाच्या उत्पादनासाठी त्यांनी 1500 कोटी रुपये खर्च करून उभारलेला कारखाना आणि या मोटारींनी भारतात मिळविलेले अभूतपूर्व यश, यामुळे त्यांनी टीकाकारांची तोंडे गप्प केली आहेत.
आजही रात्रीच्या मेजवान्यांना क्वचितच उपस्थिती लावणारे रतन टाटा सकाळी आठ वाजता आपल्या कार्यालयात असतात. अविवाहित असलेल्या रतन टाटा यांची राहणीही साधी आहे. टाटा उद्योगसमूहाची देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी भरभरून दान करण्याची परंपरा त्यांनी वाढविली आहे. देवळे व धर्मशाळा उभारण्यापेक्षा प्रयोगशाळा उभारण्याला आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याला आपल्याला आवडते, असे ते आजही सांगतात. म्हणूनच एव्हरेस्ट सर करणाऱ्या सुरेंद्र चव्हाणचे कौतुक घरी बोलावून ते करतात. या साधेपणामध्येच त्यांचा मोठेपणा आहे.

No comments: