मानमोहनसिंग सरकारचा पाठिंबा डाव्या पक्षांनी काढून घेतल्यानंतर लोकसभेच्या सभापतिपदाचा प्रश्न अचानक निर्माण झाला आहे. विद्यमान अध्यक्ष सोमनाथ चटर्जी हे राजीनामा देणार का, या प्रश्नाला काल त्यांच्या कार्यालयाने नकारार्थी उत्तर देऊन पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला खरा; पण त्यामुळे चर्चा काही थांबलेली नाही. 1971 पासून फक्त एका लोकसभेचा अपवाद सोडला, तर सातत्याने निवडून येणाऱ्या आणि कायमच विरोधी पक्षामध्ये काम करणाऱ्या सोमनाथ चटर्जींबाबत, ते सत्तापदासाठी थांबून राहिले आहेत अशी चर्चा होणे हे वेदनादायक आहे. मात्र, आयुष्यात एकदा केलेल्या तडजोडीची किंमत कधी तरी मोजावी लागतेच, या न्यायाने ते बरोबरही आहे.
चटर्जींचा जन्म आसाममधील तेजपूरचा. त्यांचे शिक्षण आणि कारकीर्द घडली ती पश्चिम बंगालमध्येच. वडील निर्मलचंद्र चटर्जी हे देशाच्या राजकारणातील एक प्रस्थ होते. त्यांची कारकीर्द सुरू झाली ती हिंदू महासभेपासून. या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविल्यानंतर निर्मलचंद्रांचे मतपरिवर्तन झाले आणि बंगालमध्ये जोर असलेल्या डाव्या विचारसरणीची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. या पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊन खासदारही केले. घरामध्ये असलेल्या या राजकीय वातावरणाचा सोमनाथबाबूंवर प्रारंभीपासूनच संस्कार होता. महाविद्यालयीन शिक्षणानंतर श्रीमंत बंगाली कुटुंबातील तत्कालीन परंपरेनुसार ते लंडनला कायद्याची पदवी घ्यायला गेले.
केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा भारतात येऊन कोलकता उच्च न्यायालयामध्ये वकिलीही सुरू केली. काही काळातच चांगला जम बसल्यानंतर वडिलांच्या प्रेरणेने 1968 मध्ये ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य बनले. त्या वेळेस त्यांचे वडील खासदार होते. 1971 मध्ये त्यांचे अचानक निधन झाले आणि पक्षाने सोमनाथ चटर्जींना लोकसभेची उमेदवारी दिली. तेव्हापासून 1984 चा अपवाद सोडला, तर सोमनाथबाबूंनी आजपर्यंत कधीही पराभव पाहिलेला नाही. 1984 मध्ये जाधवपूरमधून ममता बॅनर्जी यांनी त्यांना पराभूत करून देशात खळबळ उडवली होती. मात्र, त्यानंतर बोलपूरमध्ये 1985 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी सिद्धार्थ शंकर रे यांच्यासारख्या कॉंग्रेस दिग्गजाला पराभूत करून लोकसभेत पुन्हा प्रवेश केला होता.
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांचे सोमनाथबाबू हे निकटवर्ती. किंबहुना बसूंनी बंगालमध्ये राज्य करायचे आणि दिल्लीमध्ये सोमनाथबाबूंनी पक्षाचा झेंडा सांभाळायचा, अशी कामाची विभागणीच करण्यात आली होती. त्यांच्या पक्षातील वर्चस्वाला थोडाफार धक्का बसला तो बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे घेतल्यानंतर; पण त्यापाठोपाठच सोमनाथबाबूंना दिल्लीत लोकसभेचे सभापतिपद मिळाले आणि ही त्रुटीही काहीशी कमी झाली.
सोमनाथबाबूंना 1996 मध्ये सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरविण्यात आले. लोकसभेत ते बोलायला उभे राहिले, की सभागृहात शांतता पसरते. सोमनाथबाबूंच्या भाषेमध्ये विनोद अपवादाने येतो. ते बोलायला लागले, की सरकारच्या धोरणांच्या चिंध्या उडविल्या जातात. अतिशय धीरगंभीर आवाजामध्ये "युनियन'बाजीचे जोरदार समर्थन करीत देशातील कष्टकरी, कामगार यांचा आपण आवाज असल्याची भूमिका ते पार पाडतात. अर्थात सभागृहाच्या बाहेर मात्र त्यांच्यातील कडवटपणा जाणवत नाही. पक्षांच्या सीमारेषा ओलांडून त्यामुळेच ते मैत्र जुळवू शकतात.
फावल्या वेळामध्ये बागकाम करायला आवडणाऱ्या सोमनाथबाबूंचे वाचन आणि लिखाण हेही छंद आहेत. प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये ते क्वचितच वादामध्ये सापडले आहेत. खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक यावी यासाठी सोमनाथबाबूंनी केलेल्या परदेशवाऱ्या हा चर्चेचा आणि टीकेचा विषय झाला होता. त्यानंतर सभापती झाल्यानंतर "शांतिनिकेतन विकास प्राधिकरणा'चे स्वीकारलेले अध्यक्षपद हे "ऑफिस ऑफ प्रॉफिट' आहे, अशी टीका त्यांच्यावर झाली होती. अन्यथा त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्यांपलीकडे त्यांच्याबाबत या संपूर्ण काळात वादळ उठलेले नाही.
बंगाल आणि केरळमध्ये सत्ता मिळाल्यानंतर संपूर्ण देशाच्या राजकारणावर नियंत्रण ठेवण्याची संधी कम्युनिस्ट पक्षाला आतापर्यंत तीन वेळा मिळाली. या प्रत्येक वेळेस सोमनाथबाबू ही संधी मिळवून देण्यामध्ये आणि पक्षाच्या दृष्टीने त्याचे "सोने' करण्यामध्ये आघाडीवर होते. जगामध्ये अनेक ठिकाणी साम्यवादाचा पराभव होत असतानाही, त्याच विचारसरणीचा प्रभावीपणे प्रचार करण्यासाठी धडपड करणाऱ्या देशातील मोजक्या व्यक्तिमत्त्वांमध्ये त्यांचा समावेश होईल. इतकी वर्षे केवळ विरोधकाचीच भूमिका पार पाडलेल्या आणि सत्ता कधीही मिळणार नाही, हे माहीत असतानाही हरलेली लढाई पुन्हा पुन्हा लढणाऱ्या सोमनाथबाबूंबाबत ते सभापतिपदाला चिकटून बसले आहेत, अशी चर्चा होणे, हाच वेदनादायक प्रकार आहे.
येत्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सोमनाथ चटर्जी उमेदवार म्हणून असतीलच. त्यानंतर मात्र ते सत्तेत असणार की विरोधी बाकांवरील आपल्या अढळपदावर पुन्हा एकदा विराजमान होणार, हे येणारा काळच सांगेल.
--------------
पराग करंदीकर
parag.karandikar@esakal.com--------------------
Wednesday, July 16, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment