Tuesday, May 20, 2008

अपयशी शेतकरी नेता

उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री मायावती यांच्याबद्दल अनुद्‌गार काढल्याबद्दल शेतकरी नेते महेंद्रसिंह टिकैत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेली सुमारे 35 वर्षे शेतकऱ्यांवर "राज्य' करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली ती 1979 मध्ये दिल्लीत "बोट क्‍लब'वर झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी आणि त्यांच्यात झालेल्या झटापटीमुळेच. देशाच्या राजकारणात त्यांनी स्थान मिळविले ते या मेळाव्यानंतरच.
टिकैत मूळचे उत्तर प्रदेशच्या पश्‍चिमेकडील शिसौली या गावचे. सातव्या शतकामध्ये ठाणेसरचा राजा हर्षवर्धन याने टिकैत यांच्या घराण्याला बालियॉं खापचे प्रमुखपद बहाल केले असल्याचे इतिहास सांगतो. शिसौली आणि त्याच्या परिसरातील सुमारे शंभर खेडी ही आजही त्यांचे नेतृत्व मानतात. 1935 मध्ये जन्म झालेल्या टिकैत यांच्याकडे गावाचे चौधरीपण वयाच्या आठव्या वर्षी आले. वडिलांच्या निधनानंतर मोठा मुलगा या नात्याने टिकैत 1943 मध्ये गावाचे चौधरी बनले. वयाच्या 78 व्या वर्षीही तेच या गावाचे चौधरी आहेत. या "खाप' परिसरातील शेतकरी गेली शतकानुशतके या घराण्याचे नेतृत्व मान्य करीत आले आहेत. टिकैत यांचे वडील चौधरी असताना या गावकऱ्यांनी 1941 मध्ये पुन्हा एकदा ठराव मंजूर करून, चौधरी सांगतील त्याचप्रकारे वागण्याचा व त्यांनी मागितल्यास प्राणही देण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
उत्तर प्रदेशातील पश्‍चिम भाग हा संपन्न. चौधरी चरणसिंह यांनी आपले संपूर्ण राजकारण याच परिसरातील शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर केले. जाटांचे प्रभावक्षेत्र असलेल्या या भागावर कोणाची पकड असते तो नेता दिल्लीमध्ये राजकारण करण्यात यशस्वी ठरतो, असे मानले जाते. स्वातंत्र्यानंतरच्या तीन दशकांत चौधरी चरणसिंह यांनी त्याचा पुरेपूर वापर केला. जाटांसाठी हरियाना या राज्याची स्थापना झाल्यानंतरही उत्तर प्रदेशातील जाटांचे राष्ट्रीय राजकारणातील महत्त्व कमी झाले नाही, याचे कारण चरणसिंह हेच होते. त्यांच्यानंतर या भागाचे नेतृत्व करण्यासाठी टिकैत यांनी जोरदार प्रयत्न केले. जाट शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी त्यांना आपले नेते मानले खरे; पण मतदानाची वेळ आली तेव्हा त्यांनी टिकैत यांच्याकडे पाठ फिरवली. चरणसिंह यांचे सुपुत्र अजितसिंह यांनाच त्यांनी आपले नेते मानले. याचेच कारण म्हणून टिकैत यांनी 1986 मध्ये "भारतीय किसान युनियन' स्थापन केल्याच्या दिवसापासून अजून एकदाही त्यांना आपला एकही खासदार संसदेमध्ये पाठविता आलेला नाही.
"बोट क्‍लब'वर आठ दिवस काही लाख शेतकऱ्यांना घेऊन मुक्काम करणाऱ्या टिकैत यांनी 1988 मध्ये तत्कालीन सरकारची झोप उडविली होती. "शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर माघार घेतली जाणार नाही, शेतकऱ्यांच्या मालाला निश्‍चित भाव मिळाल्याशिवाय ते कोणाचेही ऐकणार नाहीत,' अशा त्यांच्या गर्जना क्षणभर का होईना; पण शेतकऱ्यांना सुखावून गेल्या होत्या. राष्ट्रीय राजकारणात त्यांना स्थान मिळविता आले नसले, तरीही शेतकऱ्यांमध्ये त्यांना आदराचे स्थान आहे. साधेपणा, बिनधास्त बोलणे, हुक्का पिणे या त्यांच्या गोष्टी शेतकऱ्यांना आवडतात. नव्वदच्या दशकात टिकैत यांनी देशातील शेतकऱ्यांचा नेता होण्याचे बरेच प्रयत्न केले. देशाच्या विविध राज्यांमध्ये असलेल्या शेतकरी संघटनांना एकत्र आणण्याची धडपडही त्यांनी केली; मात्र प्रत्येक वेळेस त्यांचा संशयी स्वभाव आडवा आला. कोणावरच विश्‍वास न टाकणाऱ्या या नेत्याने, प्रत्येक संघटनेच्या प्रमुखाकडे आपला प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले. त्यामुळे नंतर कोणीच त्यांच्यावर विश्‍वास टाकेनासे झाले.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्याबाबत जातिवाचक उल्लेख केल्यानंतर टिकैत या आठवड्यात बातम्यांमध्ये झळकले; मात्र त्यांची या वेळची प्रतिमा आधीपेक्षा वेगळी होती. कोणत्याही नेत्याला व्यासपीठावरून "चोर' म्हणण्याबाबत ख्याती असलेल्या टिकैत यांनी दिलगिरी व्यक्त करताना माध्यमांसमोर जोडलेले हात बरेच काही सांगून गेले. वयानुसार आता उमेद संपल्याचेच त्यांनी सूचित केले. इतिहासाच्या पानांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या टिकैत यांना राजकारणात यश का मिळाले नाही, याचे उत्तर मात्र आजपर्यंत कोणालाच मिळालेले नाही. कदाचित "शहाण्या' मतदाराने त्यांना दिलेली ही "शिक्षा' हेच त्यांचे वेगळेपण ठरावे.
---------------------------
----------------------
पराग करंदीकर
parag.karandikar@esakal.com
-----

No comments: