Friday, May 23, 2008

"राज' की बात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत जाहीर भाषण करून पुन्हा धुरळा उडवून दिला आहे. मराठी म्हणजे नक्की कोण, इथपासून ते मुंबई आणि महाराष्ट्रात नोकरी कोणाला मिळाली पाहिजे, इथपर्यंतचे अनेक प्रश्‍न उपस्थित करीत त्यांनी स्वतःच त्याची उत्तरे दिली आहेत. एका वर्षाच्या अंतराने शिवाजी पार्कवर झालेल्या दोन भाषणांनी राज यांना महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये ओळख मिळवून दिली आहे.
राज ठाकरे यांचा राजकारणातील प्रवास हा भारताच्या राजकारणातील घराणेशाहीच अधोरेखित करणारा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतरच्या काळात त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांच्या घरात राजचा जन्म झाला. लहानपणापासूनच राज वडिलांइतकाच काकांच्याही प्रभावाखाली होता. शिवसेनेच्या उभारणीचा तो काळ होता. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा या विचाराने आणि बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव नेते असे मनापासून मानणाऱ्या "शिवसैनिकां'मुळे शिवसेनेने मुंबई महापालिकेतील सत्ता मिळविली आणि त्यानंतर पाठोपाठ संपूर्ण राज्यामध्ये विस्तार करण्यास प्रारंभ केला होता. 1984 नंतर देशाचे राजकारण हिंदुत्वाभोवती फिरू लागले आणि शिवसेनेचा प्रसारही वेगाने वाढू लागला. याच काळात बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज दिसू लागले होते. जे. जे. कला महाविद्यालयातून चित्रकलेची पदवी पूर्ण केल्यानंतर, राज्याच्या दौऱ्यांमध्ये तर कधी दसरा मेळाव्यात व्यासपीठावरील राजकडे पाहून अनेकांना शिवसेनेच्या स्थापनेपूर्वीचे बाळासाहेबच आठवू लागले.
त्यानंतर राज यांना शिवसेनेच्या विद्यार्थी विभागाचा- भारतीय विद्यार्थी सेनेचा- प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. याच कालावधीमध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेला "जय महाराष्ट्र' केल्यामुळे दुखावलेल्या बाळासाहेबांनी राज आणि उद्धव यांना राजकारणात आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाऊ लागले; पण तोपर्यंत बाळासाहेबांचा कोणताच मुलगा शिवसेनेच्या व्यासपीठावरही दिसत नव्हता. त्यामुळे राज हाच बाळासाहेबांचा राजकीय वारसदार असणार, अशी चर्चा सुरू झाली होती. राज यांचे दिसणे, "ठाकरी' शैलीतून भाषण करणे आणि व्यंगचित्रे काढणे या सर्वच गोष्टी त्याला अनुकूल होत्या. पाहता पाहता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना "राजसाहेब' करून टाकले. शिवसेनेतील काही नेत्यांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली होती; पण बाळासाहेब ठाकरे यांनी थेट शिवसेनाप्रमुखपद सोडण्याचा इशारा दिला आणि सर्व शिवसैनिकांच्या विनंतीवरून नंतर ते पद स्वतःकडे ठेवले. या एका तडाख्यात त्यांनी शिवसेनेवरील आपली पकड भक्कम केलीच; पण त्याचबरोबर राज यांनाही प्रस्थापित करून टाकले. राज यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी सेनेची घोडदौड सुरू होती. मुंबई-पुण्यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करून राजने आपले संघटनकौशल्य दाखवून दिले होते. त्यातच रमेश किणी यांच्या खुनाच्या प्रकरणात त्यांचे नाव गोवले गेले. या सर्व कालावधीत त्याची राजकीय कारकीर्द संपुष्टात येते काय, अशीच चिन्हे वाटू लागली होती. याच काळानेच बहुधा राज यांना राजकारण कोणत्या थराला जाऊ शकते, याचा अनुभव दिला.
पुढे 1999 च्या विधानसभा निवडणुकीत राज हा शिवसेनेच्या प्रमुख प्रचारकांपैकी एक होता. विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांचे जाळे संपूर्ण राज्यात त्याने उभे केले होते. निवडून आल्यानंतर काही आमदारांनी "मातोश्री'बरोबरच "कृष्णकुंज'वर हजेरी लावण्यास प्रारंभ केला, तो याच काळात. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. बाळासाहेबांचा राजकीय वारसदार नक्की कोण, याची चर्चा पुन्हा सुरू झाली. मुंबई महापालिकेतील सत्तासूत्रे पाहता पाहता उद्धव यांच्या हातात गेली आणि राज यांची घुसमट सुरू झाली. पडद्यामागची धुसफूस हळूहळू माध्यमांच्या कानापर्यंत पोचू लागली होती. मध्येच कधी तरी रुसलेल्या राज ठाकरे यांची "समजूत'काढण्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. 2002 मध्ये राजनेच उद्धव ठाकरे यांचे नाव शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदासाठी सुचविले, तेव्हा तर सर्व काही आलबेल झाल्याचेच चित्र उभे राहिले.
मात्र, वस्तुस्थिती वेगळीच होती. 2004 मध्ये राज ठाकरे यांनी, "मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल,' असे जाहीर करून आपण निवडणुकीच्या राजकारणात उतरणार असल्याचे संकेत दिले आणि शिवसेना पुन्हा ढवळून निघाली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राजच्या समर्थकांना उमेदवारी नाकारण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर उद्धव वेगाने शिवसेनवर पकड मिळविताना दिसले आणि राज काहीसे शांत. याच काळात त्यांचे नाव आले ते कधी तरी त्यांच्या परदेश वारीमुळे किंवा काही व्यावसायिक कारणांनी.
गेल्या वर्षी मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत शिवसेना सोडली. त्यानंतर ते नक्की काय करणार असे विचारले जाऊ लागले. कोणत्या तरी दुसऱ्या पक्षाच्या वळचणीला जाण्यापेक्षा स्वतःचा पक्ष काढण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. "राजकीय पक्ष चालविण्यासाठी सकाळी लवकर उठावे लागते,' असेही त्याला ऐकविले गेले! वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी स्वतःच स्वतःला अपर्ण करणाऱ्या राज यांनी गेल्या वर्षभरात सातत्याने मराठीचा मुद्दा लावून धरला आहे. महाराष्ट्रात परप्रांतीयांची दादागिरी चालवून घेणार नाही, या त्यांच्या भूमिकेवरून आता गदारोळ सुरू आहे. त्यांची भूमिका योग्य का अयोग्य, त्यांच्या भाषणाला जमणाऱ्या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होणार का, येत्या काळात त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे परिमाण देणार का.. या प्रश्‍नांची उत्तरे येणारा काळच देईल; पण सध्या तरी महाराष्ट्रातील राजकारण हे त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्‌द्‌याभोवती फिरू लागले आहे, हे खरे.
-------------
पराग करंदीकर

No comments: