Tuesday, May 20, 2008

खली "बली'

गेले काही दिवस माध्यमांमध्ये चर्चा आहे ती खलीची. अनेक वर्षे भारतात राहून "मिस्टर इंडिया' हा किताब दोन वेळा जिंकल्यानंतरही दुर्लक्षित राहिलेली एखादी व्यक्ती माध्यमांनी ठरविल्यास प्रसिद्धिझोताच्या मधोमध कशी येऊ शकते, याचे "खली' हे उत्तम उदाहरण. कोण आहे हा खली आणि त्याच्याबद्दल अचानक एवढे प्रेम का, हा प्रश्‍न त्यामुळेच उपस्थित होत आहे. हा अवाढव्य खली आहे तरी कसा?
तर तो मूळचा आहे हिमाचल प्रदेशमधला. दिलीपसिंग राणा हे त्याचे मूळ नाव. सात भावंडांच्या कुटुंबात एखाद्या मुलाकडे जितके लक्ष असते तितकेच लक्ष दिलीपकडे त्याच्या आईवडिलांचे होते. त्याचे आई वडील, त्याच्याइतके उंच नव्हते; पण त्याचे आजोबा मात्र त्याच्या धिराना गावामधील सर्वांत उंच व्यक्ती म्हणून माहिती होते. गरिबीमुळे दिलीपने आपल्या वडिलांना हातभार लावण्यासाठी रस्त्यावर दगड फोडण्याचे काम सुरू केले. त्याला अभ्यासात फारशी गती नसल्याने आई-वडिलांनीही ते मान्य केले. धिप्पाड अंगकाठीमुळे या दगड फोडण्यामध्येही दिलीपकडे काम यायचे ते मोठा दगड फोडून त्याचे लहान तुकडे करायचे. त्याचे सहकारी मग या लहान तुकड्यांची खडी करायचे. या श्रमांनी त्याची अंगकाठी अधिकच भक्कम होत गेली आणि हळूहळू त्याची पावले आखाड्याकडे वळू लागली. एरवी अभ्यासासाठी कधीही शाळेकडे न फिरकणाऱ्या दिलीपला क्रीडा स्पर्धांच्या वेळी शाळेतून आवर्जून निमंत्रण यायचे. जिल्हा आणि राज्य क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या उंची आणि ताकदीच्या जोरावर काही सुवर्णपदकांची कमाई तो लीलया करायचा.
भुल्लर यांची कृपा
त्याच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने दिशा लाभली ती, एका क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात, पंजाब पोलिस दलाचे प्रमुख एम. एस. भुल्लर यांची नजर त्याच्यावर पडल्यानंतर. हा मुलगा दगड फोडण्याचे काम करतो हे ऐकून ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी दिलीपला पंजाब पोलिसमध्ये शिपाई म्हणून भरती करून घेतले. दरमहा निश्‍चित पगार मिळू लागला आणि पोलिस दलातील चांगल्या मार्गदर्शकांचे मार्गदर्शनही मिळू लागले. शरीरसौष्ठवाकडे लक्ष देण्यास त्याने सुरवात केली आणि 1997 मध्ये तो "मिस्टर इंडिया' म्हणून गौरविला गेला. त्यापाठोपाठच्या वर्षातही त्याने हाच किताब मिळविला; पण त्याची चर्चा फार झाली नाही. या किताबांनंतर त्याला बढती मिळून तो फौजदार झाला.
पंजाबमध्ये तरुणांनी त्याला डोक्‍यावर घेतले. अमेरिकेत गेल्यास त्याचे नशीब उघडेल, असे सांगून त्याच्या मित्रांनी त्याला अमेरिकेमध्ये पाठविले. व्यावसायिक व्यायामशाळेमध्ये तो दाखल झाला तो "रेस्टलर' बनण्यासाठी. "ऑल प्रो रेस्टलिंग'मध्ये 2000 मध्ये त्याने पदार्पण केले. पहिली लढत जिंकल्यानंतर त्याची दखल घेतली जाऊ लागली. 2001 मध्ये त्याचबरोबर सराव करताना ब्रायन आँग या कुस्तीगिराचे निधन झाले. त्यामध्ये दिलीपचा दोष आहे किंवा नाही, याच्यावरून बरेच रण माजले. त्यानंतर अमेरिकेतून दिलीप जपानमध्ये दाखल झाला. जपानमध्ये नव्याने सुरू झालेल्या व्यावसायिक कुस्ती स्पर्धेमध्ये त्याचे नामकरण "जायंट सिंग' असे करण्यात आले. त्याची "जायंट सिल्वा'बरोबरची जोडी ही व्यावसायिक कुस्तीमधील सर्वांत उंच आणि वजनदार जोडी होती. सव्वासात फूट सरासरी उंची आणि सरासरी चारशे पौंड वजन हे आकडेच सामान्यांना चक्रावून टाकणारे होते. जपानमध्ये मात्र त्याला फारसे यश मिळाले नाही. याच दरम्यान दिलीपने लग्नही केले. "टिपिकल' पंजाबी घरामध्ये वाढलेल्या हरमिंदर कौरने दिलीपला जपानमध्ये साथ दिली. 2002 मध्ये जायंट सिंग आणि जायंट सिल्वा यांच्यात एक लढत झाली आणि त्यामध्ये दिलीप पराभूत झाला. त्यानंतर तो पुन्हा मायदेशात परतला. 2004 मध्ये दिलीपला हॉलिवूडमधून "ऑफर' आली. "द लॉंगेस्ट यार्ड' नावाच्या चित्रपटातून तो झळकला आणि त्याच्या लोकप्रियतेची खात्री पटल्याने 2006 मध्ये त्याला "वर्ल्ड रेस्टलिंग एंटरटेनमेंट'ने निमंत्रित केले. या वेळेस त्याचे नामकरण "द ग्रेट खली' असे करण्यात आले होते.
कालीमातेपासून प्रेरणा
कालीमातेपासून प्रेरणा घेऊन आपण हे नाव घेतल्याचे खली सांगतो. तो अतिशय धर्मवेडा आणि भाविक आहे. एके काळचा गरीब खली आज त्याच्या गावातील सर्वांत श्रीमंत माणूस आहे. आता त्याने आपला मुक्काम जालंधरला हलविला असला, तरीही गावातील रस्ते, शाळा, व्यायामशाळा यांच्यासाठी तो सढळ हाताने खर्च करतो. जागतिक स्तरावर व्यावसायिक कुस्तीमध्ये नाव मिळविलेला खली, आशुतोष महाराजांचा भक्त आहे. दिसायला धिप्पाड असला, तरीही मनाने तो खूप निर्मळ आणि मितभाषी असल्याचे त्याचे परिचित सांगतात. अडचणीत असलेल्या कोणालाही मदत करण्यासाठी तो धावतो. आपल्याकडे चांगल्या मोटारी असाव्यात आणि त्या भरधाव चालवाव्यात असे त्याला वाटते; पण त्याच्या उंचीमुळे त्याला छोट्या गाड्यांमध्ये बसता येत नाही, ही त्याची अडचण आहे.
प्रारंभी त्याला इंग्रजीचा गंधही नव्हता. पण आता तो थोडेफार इंग्रजी बोलायला लागला आहे. अमेरिकेतील कुस्ती स्पर्धांत सहभागी झाल्याने त्याची आर्थिक स्थिती सुधारली असली, तरीही पंजाब पोलिसमधील नोकरी त्याने सोडलेली नाही. अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारण्यासही त्याने नकार दिला आहे. पंजाबी खाण्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या दिलीपला सात वर्षे अमेरिकेत राहूनही "फास्ट फूड' अजिबात आवडत नाही. खली हा शाकाहारी आहे, असे सांगितले जात असतानाच त्याला दररोज पाच लिटर दूध, दोन ते तीन किलो चिकन, एक किलो सुकामेवा आणि तीस ते चाळीस रोट्या असा आहार असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. दारू आणि सिगारेट या व्यसनांपासून मात्र तो दूर आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक कुस्तीपटूंमध्ये आढळणाऱ्या अमली किंवा उत्तेजक पदार्थांपासूनही तो दूर आहे.
असा हा खली महिन्यापूर्वी भारतात परतल्यानंतर माध्यमांमधून त्याचा अचानक गवगवा सुरू झाला. बलवान खलीने उडविलेल्या खली"बली'मुळेच नोंद माध्यमांना घ्यावी लागत आहे, हेच खरे.
------------
पराग करंदीकर
parag.karandikar@esakal.com

No comments: