गेले अनेक दिवस नारायण राणे अस्वस्थ आहेत. अस्वस्थता त्यांनी लपवून ठेवलेली नाही. मुख्यमंत्रिपदाची माळ पुन्हा त्यांच्या गळ्यात पडणार अशा बातम्या आता हळूहळू सवयीच्या होऊ लागल्या आहेत. त्यामुळेच कदाचित राणे यांच्या अस्वस्थतेमध्ये भरच पडली आहे. या पुढच्या काळात राणे नक्की काय पवित्रा घेणार याविषयी अनेक तर्क सुरू आहेत; पण राणे यांचा इतिहास आणि स्वभाव पाहता ते काही तरी धाडसी पाऊल उचलण्यास मागे पुढे पाहणार नाहीत, असे म्हणतात. राणे मूळचे कोकणातले. घरची परिस्थिती बेताची. साहजिकच बालपण फार सुखात गेले नाही. कोकणातील प्रत्येक जण नशीब शोधण्यासाठी तेव्हा मुंबईची वाट पकडायचा. राणेही त्याला अपवाद नव्हते. 1960 च्या दशकामध्ये ते मुंबईत दाखल झाले. पोटाची खळगी भरण्यासाठी वाटेल ते करण्याची जिद्द आणि कोणत्याही स्थितीमध्ये आपणच आपला उत्कर्ष साधायचा हा ध्यास घेऊन आलेला हा माणूस राज्याचा मुख्यमंत्री होईल, असे कोणालाच वाटले नव्हते. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने चोख उत्तर दिले; पण मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर या शहरातील मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. ठाकरे यांच्या आक्रमक नेतृत्वाने त्या वेळच्या तरुणांना भुरळ घातली. राणे या युवकांपैकीच. भूमिपुत्रांसाठी काहीही करू शकते, ती शिवसेनाच या अढळ विश्वासाने राणे शिवसेनेत सैनिक म्हणून दाखल झाले, त्या घटनेला आता सुमारे 40 वर्षे झाली. बाळासाहेबांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आपण कधीच कोणाचीही फिकीर न करता लढलो, प्रसंगी "राडे' केले, असे राणे यांनीच जाहीरपणे अनेक वेळा सांगितले आहे. आक्रमकपणाला शिवसेनेचे कोंदण मिळाल्यानंतर राणे वेगाने सत्तासोपानाच्या पायऱ्या चढले. "मातोश्री'वरून येणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी करायची एवढी एकच गोष्ट त्यांना बाळासाहेबांच्या जवळ घेऊन गेली. संपूर्ण देशात सक्षम कारभाराबद्दल गौरविल्या गेलेल्या "बेस्ट'चे अध्यक्षपद राणे यांना दोन वेळा मिळाले, ते ठाकरे यांच्यामुळेच. बेस्टच्या अध्यक्षपदाचा उपयोग त्यांनी आपल्या गावाकडच्या लोकांना नोकऱ्या देण्यासाठी केला. साहजिकच त्यांची लोकप्रियता वाढली. भारतीय जनता पक्षाशी युती करून शिवसेना 1990च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उतरली. कोकणातील अनेक मतदारसंघांमध्ये मुंबईतील अनेक नेत्यांना संधी मिळाली. राणे यांनी मालवणमध्ये काम त्यापूर्वीच सुरू केले होते. त्यामुळे राणे उभे राहिले आणि निवडूनही आले. श्रीधर नाईक प्रकरणात राणे यांचे नाव आले. त्या पाठोपाठ मुंबईमध्ये दंगल झाली. ही दंगल आणि भाजप-शिवसेनेने एन्रॉनबद्दल उठविलेले रान याच्यामुळे कॉंग्रेसला 1995 मध्ये महाराष्ट्रातील सत्ता गमवावी लागली. शिवसेनाप्रमुखांनी मनोहर जोशी यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले. त्याच वेळेस कोठेतरी राणे यांनी एक दिवस आपणही या खुर्चीत बसायचे याची खूणगाठ बांधली होती. पाच वर्षांच्या आमदारकीमध्ये राणे यांनी प्रशासन कसे चालते, याचा अनुभव घेतला होता. मनोहर जोशींच्या राजवटीत ते महसूलमंत्री झाले. साहजिकच त्यांचे शिवसेनेतील महत्त्वही वाढले होते. फक्त आपलाच मतदारसंघ नव्हे, तर संपूर्ण कोकणामध्ये विकासाची गंगा नेली, तर पुढच्या राजकारणामध्ये बालेकिल्ला तयार करण्यास मदत होईल, हे हेरून राणे यांनी कोकणात कामांचा धडाका लावला. त्यापूर्वी अनेक वर्षांमध्ये कधीही डांबर न पडलेले रस्ते अचानक गुळगुळीत झाले आणि मुंबईतील चाकरमान्यांबरोबरच कोकणातील मतदारही राणे यांच्या मागे उभा राहिला. रस्त्यांबरोबरच विविध प्रक्रिया प्रकल्प उभारून रोजगाराच्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा सहकारातून राजकारण करण्याचा कित्ता राणे यांनी गिरविला. मनोहर जोशींना बदलण्याची चर्चा सुरू झाली, त्याच वेळेस राणे यांनी सर्व शक्तिनिशी मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न केले. अखेर शिवसेनेला राणे यांच्याशिवाय पर्यायच राहिला नाही. राणे यांच्या नेतृत्वाखालील सरकार युतीला पुन्हा सत्ता मिळवून देईल, असे चित्र त्या वेळेस उभे केले गेले. तसे मात्र झाले नाही; पण दीड वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात राणे यांनी दाखविलेला धडाका मात्र राजकारणात केस पांढरे केलेल्यांनाही चकित करणारा होता. त्या पूर्वीच्या आपल्या प्रतिमेला छेद देत, प्रशासनावर पकड असलेला उत्तम नेता म्हणून त्यांनी मिळविलेला लौकिक आजही त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत राहण्यासाठी उपयोगी पडत आहे. 2005 मध्ये राणे यांनी अचानक शिवसेना सोडण्याचा निर्णय जाहीर केला आणि शिवसेनेमध्ये हलकल्लोळ उडाला. छगन भुजबळ यांनी केलेल्या बंडाशी राणे यांच्या बाहेर पडण्याची तुलना केली गेली. शिवसेना सोडल्यानंतर राणे यांनी कॉंग्रेसचा रस्ता पकडला आणि आपल्या बरोबर आलेले आमदार राजीनामा देऊन पुन्हा निवडून येतील, असे जाहीर केले. या सर्व प्रकारामध्ये राणे यांना यश मिळाले. कोकणातील पोटनिवडणुकीमध्ये यश मिळवून त्यांनी शिवसेनेला खऱ्या अर्थाने धक्का दिला. कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतानाच राणे यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले गेले होते, असे सांगतात. त्याची पूर्तता गेल्या अडीच-तीन वर्षांत तरी झालेली नाही. आतापर्यंत त्यासाठीचे अनेक मुहूर्त काढले गेले. अनेक वेळा राणे यांच्या दिल्ली वाऱ्याही झाल्या; पण कॉंग्रेस संस्कृतीमध्ये होकाराचा अर्थ नक्की होकार असा कधी असतो आणि नसतो, हे मात्र अजूनही त्यांना कळलेले नाही. याच काळात अस्वस्थ असलेल्या राणे यांनी राज्यातील नेतृत्वावर उघडपणे हल्लाही चढविला; पण अजून तरी त्यांच्या हातात फार काही आलेले नाही. आता पुन्हा एकदा राणे भूकंप करणार असे भाकीत वर्तविण्यात येत आहे. त्यासाठीचा मुहूर्तही जाहीर झाला आहे. राणे यांनी रविवारपर्यंत काहीही बोलणार नाही, असे जाहीर करून एकप्रकारे वादळापूर्वीची शांतता निर्माण केली आहे. राणे नक्की काय करणार याबाबत कितीही अंदाज बांधण्यात येत असले, तरीही राणे यांच्याबाबत खात्रीने सांगता येईल अशी स्थिती नाही. बहुधा तीच राणे यांची ताकद आहे. त्याच्या जोरावर ते कोणाला लोळवणार हेच पाहायचे.
------------ पराग करंदीकर ---------------
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment