Friday, October 26, 2007

सु"बुद्ध' -

पश्‍चिम बंगालमध्ये सिंगूर आणि त्यापाठोपाठ नंदीग्राम येथे विशेष आर्थिक क्षेत्र तयार करण्यासाठी शेतकऱ्यांकडून जमीन ताब्यात घेण्याच्या प्रकरणावरून पुन्हा एकदा पश्‍चिम बंगाल आणि त्याचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वास्तविक साम्यवादाचा पुरस्कार करणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या आघाडीचे पश्‍चिम बंगालमधील राज्य सरकार भांडवलदारांच्या हिताच्या "एसईझेड'साठी का धडपडत आहे, असा विचार स्वाभाविकपणे पुढे येतो. आणि त्यासाठी आटापिटा करणारे भट्टाचार्यही म्हणूनच वादग्रस्त ठरतात. अर्थात संघर्ष त्यांना आणि त्यांच्या पक्षाला नवीन नाही. पश्‍चिम बंगालमध्ये पंचवीस वर्षांहून अधिक काळ एकछत्री अंमल ठेवतानाही साम्यवादी पक्षांनी केलेली विचारांची लढाई आणि त्यातून निर्माण झालेले संघर्ष सर्वश्रुत आहेतच. पण तरीही आपल्या राज्याच्या हितासाठी आता फक्त साम्यवाद पुरेसा नाही, हे समजावून सांगत काळाच्या बरोबरीने पावले टाकणारे भट्टाचार्य म्हणूनच या सर्वांपेक्षा वेगळे ठरतात. 1944 मध्ये कोलकता येथेच जन्म झालेल्या बुद्धदेवांचे घराणे हे प्रसिद्ध. त्यांचे काका सुकांता भट्टाचार्य यांना संपूर्ण बंगाल क्रांतिकारक कवी म्हणून ओळखतो. प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर बुद्धदेवांनी शिक्षक होण्याचे व्रत घेतले. त्याचबरोबर कम्युनिस्ट पक्षाचे सभासदत्व घेणे आलेच. 1965 नंतरचा तो काळ भारलेलाच होता. चीनने भारतावर केलेल्या आक्रमणानंतर बंगालमध्ये साम्यवादी विचारांची लाटच होती. त्यातच बुद्धदेव मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या युवक शाखेचे सरचिटणीसपद सांभाळत होते. त्यामुळे व्हिएतनामला पाठिंबा देण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाने उभारलेल्या चळवळीत त्यांचा आघाडीचा सहभाग होता. या सहभागाची परिणती राजकारण प्रवेशात होणे अटळ होते. 1977 मध्ये बुद्धदेवांना काशीपूर विधानसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी मिळाली आणि कॉंग्रेसच्या या बालेकिल्यामध्ये त्यांनी विजयही मिळविला. कम्युनिस्ट राजवटीमध्ये 33 व्या वर्षी आमदारकी मिळणे, हीच मोठी गोष्ट होती. त्यामध्ये यश मिळाल्यानंतर पहिल्यांदाच बंगालमध्ये सत्ता मिळविणाऱ्या त्यांच्या पक्षाने त्यांना राज्यमंत्रिपदही देऊ केले. एकीकडे राजकारण करीत असतानाच बुद्धदेवांचे बंगाली रंगभूमी, संगीत आणि चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरूच होते. त्यासाठी काम करणाऱ्या संस्थांमध्ये समरसून काम करण्यापासून अडचणीतील कलाकारांच्या मागे समाजपुरुषाचा भक्कम आधार उभा करण्यापर्यंत सर्वच गोष्टी सुरू होत्या. राजकारणातून वेळ काढीत बुद्धदेवांनी रवींद्र संगीतामधील आपली आवड जोपासली आहे. त्यांचा कवितासंग्रहही प्रसिद्ध झाला आहे. इतकेच नव्हे, तर बुद्धदेवांच्या नावावर रंगभूमीसाठी लिहिलेले एक नाटकही जमा आहे. वाल्दिमिक मायोवस्की या प्रसिद्ध रशियन लेखकाच्या कथाही त्यांनी बंगालीत भाषांतरित केल्या आहेत. मंत्रिपद मिळाल्यानंतर मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी कोणते खाते आवडेल असे विचारताच बुद्धदेवांचे उत्तर ठरलेलेच होते. माहिती आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्रिपद त्यांनी मागून घेतले आणि मधल्या पाच वर्षांचा अपवाद सोडला तर 2000 मध्ये मुख्यमंत्री होईपर्यंत ते सांभाळले. आपल्याकडे सांस्कृतिकमंत्र्याला तुलनेने कमी प्रतिष्ठा असते. बंगालमध्ये मात्र चित्र नेमके उलटे आहे. या मंत्रिपदाला मोठी प्रतिष्ठा आहे. त्यामुळे 1996 मध्ये त्यांच्या गृह खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. अर्थात हे मंत्रिपद त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीला कलाटणी देणारे होते. गृह खात्यातील अर्धा भाग मुख्यमंत्री बसू यांच्या थेट नियंत्रणाखाली होता. बसूंना मुख्यमंत्रिपद स्वीकारून तब्बल 20 वर्षे झाली होती आणि आता त्यांनी खुर्ची खाली करावी यासाठी पक्षातूनही त्यांना आग्रह सुरू झाला होता. त्यातच बसू आजारी पडले. या सर्व काळात बुद्धदेवांनी त्यांना मोठी साथ दिली. आपल्या पक्षाची धोरणे सांभाळतानाही, प्रगतीच्या पाऊलखुणा ओळखल्या पाहिजेत असा विचार ते आग्रहाने मांडत होते. बसूंच्या आजारपणामध्ये राज्याची सूत्रे सांभाळताना त्यांनी घेतलेले निर्णय याच दिशेने जाणारे होते. साहजिकच बसू यांची लोकप्रियता वेगाने घसरत असताना बुद्धदेव हेच पक्षाचे आव्हान कायम ठेवतील, असा विश्‍वास पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांनाही वाटत होता. याच विश्‍वासाने त्यांच्याकडे पश्‍चिम बंगालची सूत्रे सोपविण्यात आली. त्यानंतर बुद्धदेवांनी साम्यवादाची नवी मांडणी केली. परदेशी कंपन्यांना बंगालमध्ये गुंतवणूक करता यावी, यासाठी अनुकूल निर्णयही त्यांनी घेतले. त्यावरून होणाऱ्या वादालाही त्यांनी समर्थपणे तोंड दिले. प्रगती करायची असेल तर ही संधी सोडून चालणार नाही, असे सांगत त्यांनी अनुसरलेल्या धोरणांना बंगालमधील जनतेने भरभरून पाठिंबा दिला. बसूंनाही मिळविता आला नाही, एवढा प्रचंड विजय त्यांनी मिळविला. त्यानंतर मात्र सिंगूर आणि पाठोपाठ नंदीग्राममध्ये संघर्ष सुरू झाला. शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर पुन्हा एकदा बुद्धदेवांवर चहूबाजूने हल्ला सुरू झाला आहे. ते अजूनही त्याच निश्‍चयाने टीकेला उत्तर देत आहेत. "एसईझेड' राबविताना फार तर धोरणांमध्ये थोडा बदल करू; पण काहीही झाले तरी प्रकल्प रद्द होऊन देणार नाही, ही त्यांची भूमिका आजही कायम आहे. कदाचित सध्याच्या भारतीय व्यवस्थेमध्ये तोच साम्यवादाचा नवा अर्थ आहे. - पराग करंदीकर

No comments: