Friday, October 26, 2007

कर्नाटकी राजकारणी

कर्नाटकमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. त्याच्या केंद्रस्थानी आहेत, ते मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी. दोन वर्षांपूर्वीपर्यंत कुमारस्वामी हे नाव फक्त कर्नाटकापुरताच मर्यादित होते. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे हे चिरंजीव. आपल्या वडलांनी भूषविलेल्या पदांचा जास्तीत जास्त लाभ उठवत चित्रपट तयार करायचे आणि फायदा कमवायचा अशीच त्यांची पूर्वीची प्रतिमा होती. नाही म्हणायला 1996 मध्ये ते लोकसभेवर निवडून आले; पण त्यानंतर राज्याच्या किंवा केंद्राच्या राजकीय पटलावर त्यांची नोंद अपवादानेच घेतली गेली.
दोन वर्षांपूर्वी मात्र कुमारस्वामी यांनी सर्वांनाच चकित केले. आपल्या वडिलांच्याच पक्षामध्ये फूट पाडून ते भारतीय जनता पक्षाच्या मदतीने कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तेव्हा त्यांच्यातील हुशार राजकारण्याची ओळख सर्वांनाच पटली. डावपेच लढवीत हस्तगत केलेले मुख्यमंत्रिपद आधी दिलेल्या आश्‍वासनानुसार ते आता सोडणार का, हा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. कारण दोन्ही पक्षांत झालेल्या करारानुसार तीन ऑक्‍टोबरला त्यांनी भाजपकडे सत्तासूत्रे सोपविणे आवश्‍यक आहे. मात्र, त्यामुळे संघर्ष निर्माण झाला आहे.
कुमारस्वामी यांचे राजकीय कर्तृत्व तसे फारसे नाही. देवेगौडा यांनी आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभी ठेकेदारीचा व्यवसाय केले. राज्यातील अनेक प्रकल्पांमध्ये ते मुख्य ठेकेदार होते. त्यांच्या मुलांनीही तोच मार्ग स्वीकारून आपली भरभराट करून घेतली.
कुमारस्वामी यांचे शिक्षण बंगळूरच्या शाळेतच झालेले. पुढे महाविद्यालयीन शिक्षणही बसवगुंडी येथून पूर्ण करून त्यांनी पदवी मिळवली. त्यानंतर ठेकेदारीच्या व्यवसायाबरोबरच त्यांनी चित्रपट व्यवसायामध्येही लक्ष घातले. देवेगौडा परिवाराच्या मूळ गावी सिनेमागृह बांधून त्यांनी या व्यवसायामध्ये पदार्पण केले. त्यानंतर काही चित्रपटांची निर्मिती आणि काही चित्रपटांच्या वितरणाचे हक्क घेऊन त्यांनी या क्षेत्रात जम बसविण्याचा प्रयत्न केला. अर्थात हे सर्व करताना वडील आणि ज्येष्ठ बंधू रेवण्णा यांच्यासाठी राजकारणामध्ये गरजेपुरता वावर त्यांनी ठेवलाच होता. 1996 मध्ये त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा प्रस्ताव देवेगौडा यांनी ठेवला. त्यानंतर नशिबाने पंतप्रधानपदाची माळ देवेगौडा यांच्या गळ्यात पडली; पण या काळात राष्ट्रीय राजकारणामध्ये कुमारस्वामी हे कायम दुय्यम भूमिकेतच राहिले. लोकसभेच्या त्यानंतरच्या दोन निवडणुकांमध्येही त्यांना पराभवाचाच सामना करावा लागला. याच काळामध्ये रेवण्णा या देवेगौडा यांच्या ज्येष्ठ पुत्राने कर्नाटकच्या राजकारणामध्ये पाय रोवले होते.
कुमारस्वामी यांच्या अस्तित्वाची सर्वप्रथम नोंद घेतली गेली ती जनता दलाच्या कार्याध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये. कुमारस्वामी यांनी या निवडणुकीत अचानक मुसंडी मारून आपल्या वडिलांसह सर्वांनाच चकित केले होते. सर्वांत मोठा धक्का बसला तो रेवण्णा यांना. त्यानंतर भाजपशी संधान बांधून कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी जनता दलामध्ये फूट पाडण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्नही असाच सर्वांना धक्का देऊन गेला होता. माजी पंतप्रधान देवेगौडा यांनाही तो धक्काच होता. माझा मुलगा माझे ऐकत नाही, असा न पटणारा खुलासा करण्याची वेळ त्यांच्यावर त्या वेळेस आली. मुख्यमंत्रिपदाच्या काळामध्ये त्यांचे काही निर्णय चर्चेचा विषय ठरले. विशेष करून त्यांनी बेळगावला उपराजधानीचा देऊ केलेला दर्जा, बंगळूर - म्हैसूर एक्‍स्प्रेस वे तयार करण्यात झालेला वाद असो, तो सोडविण्यासाठी कुमारस्वामी यांनी प्रयत्न केले. दुर्गम भागातील खेडेगावात जाऊन मुक्काम करण्याचा त्यांचा उपक्रम चांगलाच लोकप्रिय ठरला.
भारतीय जनता पक्षाबरोबर केलेल्या समझोत्यामध्ये कुमारस्वामी यांनी तीन ऑक्‍टोबरला सत्ता सोडण्याचे आश्‍वासन दिले होते. उपमुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी त्याची वारंवार आठवण करून देण्यास सुरवात केल्यानंतर सत्ता सोडण्याचा प्रश्‍नच नाही, असे सांगून त्यांनी वादळ उठविले. त्यापाठोपाठ, "येडीयुरप्पा सोडून दुसरा कोणी मुख्यमंत्री होणार असेल, तरच मुख्यमंत्रिपद सोडू' असे त्यांनी जाहीर करून हा पेच वाढविला. आता ते नक्की काय भूमिका घेतात, यावर फक्त कर्नाटकचे नव्हे तर देशातील राजकीय स्थितीचे भवितव्य अवलंबून आहे, एवढे नक्की.
-----------------
पराग करंदीकर
------------------

No comments: