Friday, October 26, 2007

समिधा -

यशस्वी पुरुषांच्या मागे कोणी तरी स्त्री असते, असे म्हटले जाते. बाबा आमटे यांच्या बाबतीत मात्र ही उक्ती योग्य ठरणार नाही. कारण साधना आमटे यांनी त्यांच्या बरोबरीने काम केल्यानेच बाबांचे इतके प्रकल्प यशस्वी होऊ शकले आहेत, असे म्हटल्यास गैर ठरू नये. कोणत्याही प्रकल्पाला बाबांनी प्रारंभ करायचा आणि तो पूर्णत्वाकडे नेण्याची जबाबदारी साधनाताईंनी उचलायची, असा प्रवास गेली अनेक वर्षे सुरू आहे. बाबांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानांनी गौरविण्यात आले आहे; पण साधनाताईंच्या कामाची नोंद अपवादानेच घेतली आहे. मात्र, "चतुरंग'ने ही नोंद घेतली असून, नुकताच "जीवनगौरव' पुरस्कार साधनाताईंना जाहीर केला आहे. खरे तर बाबा आणि साधनाताई यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये कोणतेही साम्य नाही. दोन वेगळ्या टोकांची भिन्न स्वरूपाची ही व्यक्तिमत्त्वे आहेत. बाबा म्हणजे वादळ आणि साधनाताई म्हणजे शांतता आणि सात्त्विकतेचा संगम. असे असतानाही गेल्या पन्नासहून अधिक वर्षे या दोघांचा "संसार' सुरू आहे. त्याचे सर्वाधिक श्रेय साधनाताईंनाच द्यावे लागेल. साधनाताई या मूळच्या घुले घराण्यातील. वेदशास्त्रसंपन्नतेचे वरदान असलेल्या या घराण्यामध्ये साधनाताईंचे वडील मात्र लवकर गेले. त्यांच्या पाच बहिणींच्या विवाहाची जबाबदारी आईने पार पाडली. मोठ्या बहिणीच्या लग्नातील वऱ्हाडामध्ये बाबाही होते. तेथेच त्यांनी या मुलींच्या आईकडे जाऊन इंदू घुले यांना मागणी घातली. या दोघांमध्ये तब्बल अकरा वर्षांचे अंतर होते. बाबा त्यांच्या विक्षिप्तपणाबद्दल त्याही वेळेस प्रसिद्ध होते. त्यांच्याबरोबरचा संसार हा काटेरी प्रवास असणार याची कल्पनाही होती. असे असतानाही या विवाहाला मान्यता मिळाली आणि इंदू घुले या साधना आमटे बनल्या. विवाहानंतर नव्या जोडप्याला लक्ष्मी नारायणाचा जोडा असे म्हणण्याची पद्धत आहे. आमटे यांच्या बाबतीत मात्र उपमा देण्यात आली ती शंकर पार्वतीची. खुद्द साधनाताईंनीच त्यांच्या आत्मचरित्रात हे नमूद करून ठेवले आहे. बाबांनी पाच कुष्ठरुग्णांच्या मदतीने सुरू केलेल्या "आनंदवना"च्या उपक्रमाला साधनाताईंची मनापासून साथ लाभली. चांगले घर आणि प्रतिष्ठित सामाजिक जीवन सोडून माळरानावर जंगली श्वापदांचा भीती असतानाही असुरक्षित घरामध्ये राहण्याचा निर्णय घेण्यासाठी खूप मोठे मन आणि निर्धार हवा. साधनाताईंनी तो दाखविला. आनंदवनापासून सुरू असलेला हा प्रवास त्यानंतरच्या प्रत्येक प्रकल्पाच्या वेळेस तसाच सुरू राहिला. अगदी वयाची 75 ओलांडल्यानंतरही नर्मदेच्या काठावर राहायला जाईपर्यंत. बाबा संपूर्ण आयुष्य एखाद्या झंझावातासारखेच जगले. कुष्ठरोग्यांचा प्रश्‍न असो, त्यांच्या पुनर्वसनाचा असो किंवा देशातील युवकांना श्रमशक्तीची ओळख करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरे असोत, बाबा एखाद्या धबधब्यासारखे कोसळतात. आपल्या प्रचंड वेगाने ते कामाला प्रारंभ करतात. बरोबर असलेल्या अनेकांना हा वेग झेपत नाही. ते या प्रवासातून बाजूला पडण्याची भीती निर्माण होते. अशा वेळेस या सर्वांना आधार वाटतो तो साधनाताईंचा. सर्वांना बरोबर घेऊन त्यांच्या सुख- दुःखांमध्ये सहभागी होत, त्या पुढे जातात. वेळ पडल्यास चार खडे बोलही सुनावतात; पण त्यांचे हे बोलही मायेचे असतात. आजपर्यंत श्रमशिबिरांमध्ये सहभागी झालेल्या हजारो युवकांनी याचे प्रत्यंतर घेतले आहे. नर्मदा आंदोलनामध्ये मात्र साधनाताईंचे वेगळे रूप पाहायला मिळाले. या आंदोलनात त्या बहुधा बाबांच्याही पुढे होत्या. धरण बांधल्यानंतर होणाऱ्या निर्वासितांची आई बनून गेली काही वर्षे त्या नर्मदेच्या काठावर राहत आहेत. आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत. अर्थात हे सर्व करताना, साधनाताई प्रसिद्धीपासून तर खूपच लांब असतात. त्यांचे "समिधा' हे आत्मचरित्र हा एक ऐतिहासिक ऐवज आहे, असेच म्हटले पाहिजे. खुद्द बाबांनीही साधनाताईच्या या सर्व गुणांचा अनेकदा जाहीरपणे गौरव केला आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीतही त्यांच्या अगोदर साधनाताईचा त्यांनी गौरव करून त्यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. अर्थात साधनाताईंचा हा प्रवास सोपा नाही. भारतामधील अनेक घरातील स्त्रियांचे त्या खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करतात. संसाररूपी यज्ञामध्ये या सर्व भारतीय स्त्रिया समिधा बनून आपली आहुतीच देत असतात. यज्ञ संपन्न झाला की नाव लक्षात राहते, ते यज्ञ करणाऱ्याचे. साधनाताईंचे जीवन असेच काहीसे आहे.
----------------------- पराग करंदीकर -----------------------

No comments: