Friday, October 26, 2007

श्रीमान अर्थमंत्री -

अर्थमंत्री पी. चिंदबरम उद्या देशाचा अर्थसंकल्प कसा सादर करतात याच्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. चिदंबरम यांनी "ड्रीम बजेट' सादर केल्याला आता एक दशकाहून अधिक काळ उलटला आहे. आणीबाणीनंतरचा काळ वगळला तर बिगर कॉंग्रेस सरकारचा पहिला अर्थमंत्री म्हणून त्यांनी तो अर्थसंकल्प सादर केला होता. त्या वेळेस देशामध्ये अनेक प्रकारची अस्थिरता होती. देशाची अर्थव्यवस्थाही काळजी करण्याच्या स्थितीत होती. आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम आता अर्धवट राहणार का, अशी शंकाही व्यक्त केली जात होती. त्या काळात चिदंबरम यांनी सादर केलेले दोन अर्थसंकल्प त्यांना विशेष प्रसिद्धी देऊन गेले होते. दहा वर्षांनंतर आता स्थिती बदलली आहे. आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम पूर्ण होत आला आहे आणि भारत एक महासत्ता बनण्याच्या दिशेने भक्कम वाटचाल करीत आहेत. अनेक वर्षांनी प्रथमच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अपेक्षेनुसार वाढ झाली आहे आणि परकीय चलनाचा साठाही मोठा झाला आहे. त्या स्थितीत चिदंबरम देशाला कोणत्या मार्गावर नेतात याबाबत निश्‍चितच उत्सुकता आहे. तमिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यातील कनाडुकथन येथे जन्मलेल्या चिदंबरम यांनी राजकारणात यायचा निर्णय आयुष्याच्या उत्तरार्धात घेतला. संपन्न कुटुंबाची पार्श्‍वभूमी असलेल्या चिदंबरम यांनी तेव्हाच्या मद्रासमधून कायद्याची पदवी संपादन केल्यानंतर "हॉर्वर्ड बिझनेस स्कूल'मधून "एमबीए' पूर्ण केले आणि वडिलांच्या इच्छेनुसार 1969 मध्ये मद्रास उच्च न्यायालयात वकिलीला प्रारंभ केला. वकिलीमध्ये सर्वोत्तम होण्याचा ध्यास केलेल्या चिदंबरम यांनी त्यानंतरच्या पंधरा वर्षांमध्ये मागे वळून पाहिले नाही. एक आघाडीचा कायदेतज्ज्ञ असा लौकिक त्यांनी कमावला. त्याच काळात राजीव गांधी यांच्या संपर्कात ते आले. उच्चशिक्षित युवकांनी राजकारणात उतरले पाहिजे, या राजीव गांधी यांच्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिला आणि 1984 मध्ये शिवगंगा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडूनही गेले. अभ्यासपूर्ण स्वभाव आणि अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेल्या चिदंबरम यांचा समावेश गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये झाला आणि त्यांना पहिल्याच वेळेस मंत्रिमंडळात स्थानही मिळाले. त्यानंतर दोनच वर्षांत त्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री पदावर बढतीही मिळाली. राजीव गांधी यांच्या अकाली मृत्यूनंतर पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश झाला. तोपर्यंत चिदंबरम राजकाणामध्येही चांगलेच तयार झाले होते. हर्षद मेहता प्रकरणामध्ये फेअरडिलचे शेअर खरेदी केल्याबाबत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्रिपद न स्वीकारण्याचा त्यांचा निर्णय राजकारणामध्ये मूल्य जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता. 1995 मध्ये वाणिज्य मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सांभाळताना त्यांनी आयात - निर्यात धोरणामध्ये केलेले मूलभूत बदल हे देशाच्या अर्थव्यवस्थेला वळण देणारे ठरले. त्यानंतर काही काळ चिदंबरम यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून जी. के. मूपनार यांच्यासमवेत तमीळ मनिला कॉंग्रेसची वेगळी चूलही मांडली. त्यातूनच त्यांना केंद्रीय अर्थमंत्रीही होता आले. पण 2004 मध्ये मूपनार यांच्या निधनानंतर मात्र त्यांनी आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करून पुन्हा एकदा देशाचे अर्थमंत्रिपद मिळविले. गेली तीन वर्षे ते करप्रणालीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयोग राबवीत आहेत. व्यक्ती म्हणून चिदंबरम फारसे लोकप्रिय नाहीत. काहीसा शिष्ट आणि हेकेखोर स्वभाव, विरोधकाला क्षमा न करण्याची वृत्ती त्याला कारणीभूत आहे. खासदार असतानाही त्यांनी प्रसंगी काळा कोट अंगावर चढवून एन्‍रॉनसारख्या कंपनीचे वकीलपत्र स्वीकारले होते. कोणत्याही व्यक्तीच्या फायद्यासाठी नियमाला अपवाद करणे त्यांना मान्य नाही; मात्र याचा अर्थ ते निर्दयी नाहीत. देशातील हिंसाचाराने ते व्यथित होतात. अशा हिंसाचारामुळे होरपळलेल्या अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी एक न्यास स्थापित केला आहे. आज पंजाब, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्‍मीर, नागालॅंड, त्रिपुरा आणि आसाम या राज्यांतील आठशेहून अधिक मुले या न्यासाने दत्तक घेतलेली आहेत. साहित्यामध्येही त्यांना रस आहे. आणि त्यांचे चॉकलेटप्रेमही तितकेच प्रसिद्ध आहे. एकाग्र होऊन काम करण्यासाठी त्यांच्या दृष्टीने चॉकलेटला पर्याय नसतो. त्यामुळे उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये चॉकलेटवरील करांमध्ये सवलत दिली गेली तर आश्‍चर्य वाटायला नको.
------------- पराग करंदीकर

No comments: