Thursday, October 25, 2007
"तिसरा' द्रविड
भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदासाठी यापुढे आपला विचार करण्यात येऊ नये, असे पत्र राहुल द्रविड भारतीय नियामक मंडळाच्या अध्यक्षांकडे दिले आणि त्यानंतर क्रिकेटविश्वामध्ये एकच खळबळ उडाली. संपूर्ण क्रिकेट जगतामध्ये "द वॉल' या नावाने प्रसिद्ध असलेल्या द्रविडने कर्णधारपद सोडण्यासाठी दिलेली कारणे कोणालाच पटणारी नव्हती. गेल्या दोन वर्षांमध्ये अतिशय अवघड परिस्थिती असताना धीरोदात्तपणे भारतीय कर्णधारपदाचा काटेरी मुकुट सांभाळणाऱ्या द्रविडने, आता या जबाबदारीचे ओझे वाटते, असे म्हणणेच पटणारे नव्हते. अर्थात, असे वाटण्याला कारणही तोच आहे. त्याचा शांत, संयमी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले चित्त ढळून न देण्याचा स्वभाव, मैदानावर आणि मैदानाबाहेरील त्याची देहबोली यांकडे पाहिले, की या माणसाला कोणतीही गोष्ट विचलित करू शकत असेल, असा प्रश्न इतरांना पडायचा. राहुल द्रविड आणि कष्ट हे समीकरण त्याच्या कसोटी क्रिकेटमधील पदापर्णापासूनच दिसून आलेच; पण क्रिकेटमधील पदापर्णापासूनच हा संघर्ष सुरू आहे. इंदूरमध्ये जन्म आणि बंगळूरमध्ये कारकीर्द असे असले, तरी तो मराठी आहे. मातृभाषा मराठीच असल्याचे तो सांगतो. जीवनसाथी म्हणूनही त्याने मराठी मुलीचीच निवड केली आहे. बंगळूरमध्ये शालेय संघात त्याला स्थान मिळाले आणि शाळेच्या क्रिकेट मार्गदर्शकांनी त्याला कर्नाटक क्रिकेट संघटनेच्या शिबिरासाठी पाठविले. स्थानिक मार्गदर्शक केकी तारापोर यांनी त्याची प्रतिभा ओळखली. पुढे पंधरा वर्षांखालील मुलांच्या कर्नाटक संघात त्याचा समावेश झाला. त्या वेळेस फलंदाजीबरोबरच यष्टिरक्षणाची जबाबदारीही राहुल सांभाळत होता. राहुलने 1991 मध्ये पुण्यात नेहरू स्टेडिअमवर रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यामध्ये जवागल श्रीनाथ आणि अनिल कुंबळे या दोन गोलंदाजांनी महाराष्ट्राच्या फलंदाजांची झोप उडविली. त्यामुळे सातव्या क्रमांकावर येऊन नाबाद 83 धावा काढणाऱ्या राहुलचे फारसे कौतुक झाले नाही. पुढच्या हंगामामध्ये तो कर्नाटक संघाचा फलंदाजीतील आधारस्तंभ बनला. मात्र, भारतीय संघाची दारे उघडण्यासाठी त्याला तब्बल पाच वर्षे थांबावे लागले. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि संजय मांजरेकर यांचा तो जमाना होता. अखेर कांबळी संघाबाहेर गेला आणि त्याची जागा राहुलने घेतली. नंतर दुखापतीमुळे मांजरेकर संघाबाहेर गेला आणि इंग्लंड दौऱ्यासाठी राहुलची निवड झाली. या दौऱ्यातील दुसऱ्या सामन्यामध्ये सौरव गांगुली आणि द्रविड या दोघांना भारतीय संघात स्थान मिळाले. भक्कम खेळी करून राहुलने आपले स्थान पक्के केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 1996 च्या दौऱ्यामध्ये द्रविड तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आला आणि त्याने शानदार शतक झळकावून सामनावीर पुरस्कारही मिळविला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेले नाही. आज कसोटी सामन्यांमध्ये 9000 पेक्षा अधिक धावा करणारा व एकदिवसीय सामन्यामध्ये दहा हजारांपेक्षा अधिक धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर सरासरीमध्ये तो सध्याच्या सर्वच खेळाडूंमध्ये अव्वल आहे. त्याच्या नावावर अनेक विक्रमही नोंदविले गेले आहेत. संघाला गरज असेल त्या प्रत्येक वेळेस राहुलने त्याच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविला आहे. मधल्या काळात त्याला एकदिवसीय सामन्यामध्ये वेगाने धावा करता येत नाहीत, असा घेण्यात येत असलेला आक्षेप त्याने आपल्या बॅटने उत्तर देऊन संपविला होता. एक अतिरिक्त गोलंदाजाची गरज संघाला आहे, हे लक्षात आल्यानंतर त्याने पुन्हा एकदा यष्टिरक्षणाची जबाबदारीही स्वीकारली होती. सौरव गांगुली कर्णधार झाल्यानंतर राहुलची निवड उपकर्णधार म्हणून करण्यात आली. ते दोघेही एकमेकाला पूरक होते. सौरवच्या आक्रमकतेला द्रविडच्या संयमाची साथ लाभली आणि भारतीय क्रिकेट संघाने सुवर्णकाळ पाहिला. सौरवच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेल्या 21 कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या धावांची सरासरी शंभराहून अधिक आहे. इतकेच नव्हे तर सौरव आणि सचिन या दोघांबरोबर तीनशेहून अधिक धावांची भागीदारी करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. अर्थात त्याची कामगिरी सातत्यपूर्ण असली, तरीही संघातील स्थान कायम ठेवण्यासाठी त्याला प्रत्येक वेळेस सिद्ध करायला लागले आहे. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांची कामगिरी आणि त्यांचे संघातील स्थान यांचा कधीच संबंध नव्हता आणि नसेल; पण ती गोष्ट द्रविडच्या नशिबामध्ये नाही. किंबहुना सर्वोत्कृष्ट तंत्रासाठी जगाने गौरविल्यानंतरही त्याला एकाही सामन्यामध्ये शून्यावर बाद होण्याची संधी नाही. भारतीय समीक्षकांनीही त्याच्यावर त्या बाबतीत अन्यायच केला आहे. या सर्वांचा कोणताही परिणाम न होता, सातत्यपूर्ण कामगिरी करीत राहणे आणि संघासाठी लढणे एवढेच त्याला माहीत आहे. नियतीने त्याला कायम तिसऱ्या स्थानावर ठेवले आहे. सचिन आणि सौरवच्या कर्तृत्वात इतर कोणालाही झाकोळून टाकण्याची ताकद आहे. अपवाद फक्त राहुल द्रविडचा. भारतीय क्रिकेटला असलेला हा एक शापच आहे. गुंडाप्पा विश्वनाथ आणि सुनील गावसकरच्या काळात दिलीप वेंगसरकरच्या नशिबात जे आले तेच आज द्रविडच्याही नशिबात येते आहे. निवड समितीचे अध्यक्ष असूनही वेंगसरकर या तिसरेपणावर उपाय करू शकत नाहीत, इतकेच. ------------------------- पराग करंदीकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment