Thursday, October 25, 2007

अजातशत्रू -

भारताच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागताच, सर्वप्रथम उमेदवारी जाहीर झाली, ती उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांची. भारतीय जनता पक्षाचे सदस्य असले, तरीही सर्वच राजकीय पक्षांमध्ये मित्रत्वाचे संबंध बाळगणारे शेखावत स्वतःकडे बहुमत नसले, तरीही चमत्कार घडवू शकतात, या एकाच विश्‍वासाने ती उमेदवारी जाहीर करण्यात आली. प्रतिभा पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा विजय ही औपचारिकता उरल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले असले, तरीही शेखावत यांची उमेदवारी तितक्‍याच गांभीर्याने घेतली जात आहे. याला कारणही तसेच आहे. गेली साठ वर्षे कॉंग्रेसच्या विरोधात राजकारण करणाऱ्या नेत्यांत शेखावत यांचे नाव आघाडीवर आहे. 23 ऑक्‍टोबर 1923 रोजी राजस्थानच्या सिकर जिल्ह्यामध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. शेखावत हे खरे तर राजस्थानमधील राजघराणे; पण काळाच्या ओघात या राज्याची "काप गेले आणि भोके राहिली' अशी अवस्था झालेली. भैरोसिंह शेखावत हे अशाच राजघराण्याचे वारसदार. वडिलांच्या अकाली निधनानंतर संपूर्ण घराची जबाबदारी उचलण्यासाठी त्यांनी शेतीबरोबरच नोकरी करणेही त्यांना भागच होते. ते सबइन्स्पेक्‍टरची नोकरी करीत असतानाच स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते आणि संपूर्ण युवक नव्या देशाची उभारणी करण्याच्या स्वप्नाने भारून गेले होते. याच विचाराने भारलेल्या शेखावत यांनी नोकरी सोडून संपूर्ण वेळ राजकारणामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना वेड्यात काढणारेच अधिक होते. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या जाहीरनाम्यावर त्यांच्या "त्रिमूर्ती'चा फोटो छापण्यात आला होता. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी आणि शेखावत या तिघांचा 1951 मध्ये काढलेला फोटो बरेच काही सांगणारा होता. पक्षाच्या कार्यालयातच राहून देशकार्य करण्यामध्ये रस घेणाऱ्या शेखावत यांनी त्यानंतर मात्र राष्ट्रीय पातळीपेक्षा राजस्थानलाच आपली कर्मभूमी मानले. 1952 मध्ये ते राजस्थानच्या विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले, त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिलेले नाही. 1967 च्या निवडणुकीनंतर तर शेखावत यांनी समविचारी पक्षांना गोळा करून राजस्थानमध्ये सरकार स्थापन करण्याचाही प्रयत्न केला होता; पण त्याला यश आले नाही. 1972 पर्यंत राजस्थानमध्ये विरोधी पक्षामध्ये राहिल्यानंतर जनता पक्षाच्या स्थापनेचा विचार मांडण्यात आला. त्यामुळे शेखावत राज्यसभेचे सदस्य बनून दिल्लीत आले. मात्र, जनता पक्षाच्या प्रयोगानंतर ते दिल्लीत रमले नाहीत. आणीबाणीनंतर ते पुन्हा एकदा राजस्थानात गेले. कॉंग्रेस विरोधी लाटेमध्ये 1977 मध्ये राजस्थानमध्ये भाजपचे सरकार सर्वप्रथम स्थापन करण्यात शेखावत यशस्वी ठरले. तोपर्यंत विरोधी पक्षाचे राजकारण यशस्वीपणे केलेल्या शेखावत यांनी आपण सत्तेचे राजकारणही तितक्‍याच समर्थपणे करू शकतो हे दाखवून दिले. त्यांनी सुरू केलेल्या अंत्योदय योजनेला आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविले गेले. तर महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजनेच्या प्रमाणेच "कामासाठी धान्य' योजनेचे अनुकरण राजस्थानबरोबरच इतर राज्यांनीही केले आहे. जागतिक बॅंकेने या योजनेची दखल घेतलीच; पण शेखावत यांना "सेकंड रॉकफेलर' म्हणून गौरविले. शेखावत यांनी तीन वेळा मुख्यमंत्रिपद भूषविले. बहुतेक वेळा भाजपला स्पष्ट बहुमत नसतानाही, ते सत्तेत आले आणि त्यांनी सत्ता टिकविली. समोरच्याच्या मनात काय आहे, हे ओळखून त्याला चर्चेमध्ये आपल्या बाजूला वळवून घेण्यामध्ये त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही, असे त्यांचे विरोधकही सांगतात. हे करीत असतानाच कुटुंब नियोजन, जमीन सुधारणा यासारख्या विषयांमध्येही त्यांनी केलेले काम मूलभूत स्वरूपाचे होते. त्यांच्या लोकप्रियतेच्या जोरावरच भाजपची सत्ता राजस्थानात अबाधित राहिलीच; पण दिल्लीतील सत्ता काबीज करण्यासाठी राजस्थानातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकून देण्याची कमालही शेखावत यांनी दाखविली आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या वेळेस 2002 मध्ये भाजपने त्यांचे नाव पुढे केल्यानंतर मित्र पक्षांनी त्याला अनुमोदन दिलेच. पन्नास वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर शेखावत उपराष्ट्रपती झाले. त्यानंतरही राज्यसभेचे कामकाज चालविताना त्यांनी आपल्या विरोधकांनाही जिंकून घेतले. शेखावत यांचा हाच करिष्मा येणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्येही उपयुक्त ठरेल, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. अनपेक्षित धक्के देण्यात ते प्रसिद्ध आहेतच. परवा प्रतिभा पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर थेट त्यांची भेट घेऊन त्यांनी आपल य्‌ा समर्थकांना आणि विरोधकांनाही असाच धक्का दिला होता. पुढील महिनाभर शेखावत यांच्या दृष्टीने त्यांचे अजातशत्रुत्व सिद्ध करण्याचा कालावधी असेल. त्यात ते यशस्वी होणार का? ------------------ पराग करंदीकर ------------------------

No comments: