Thursday, October 25, 2007
"पूर्वेची कन्या'
भारतामध्ये नेहरू-गांधी घराण्याला जे स्थान आहे, तेच स्थान पाकिस्तानमध्ये लाभले आहे ते भुट्टो घराण्याला. अनेक बाबींमध्ये या दोन्ही घराण्यांची आणि त्यांच्या वारसदारांची वाटचाल एकमेकासारखीच आहे; फरक आहे तो या दोन देशांच्या लोकशाही व्यवस्थेचा. वडिलांकडून वारसा मिळालेल्या बेनझीर या पाकिस्तानमधील सर्वांत लोकप्रिय नेत्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यात यश मिळविले आहे; पण त्यांचा हा प्रवास अतिशय खडतर आणि संघर्षाचा ठरला आहे. 1953 मध्ये जन्मलेल्या बेनझीर भुट्टोंचे वंशज सध्याच्या हरियानामध्ये असलेल्या भुट्टो खलान या गावचे. भारताच्या फाळणीनंतर जुनागढ संस्थान पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्यासाठी बेनझीरच्या आजोबांनी शर्थ केली होती; मात्र त्याला यश येत नाही असे दिसताच त्यांनी कराचीला स्थलांतर केले आणि आपला जम बसविला. बेनझीरचे वडील झुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानचे निर्माते बॅरिस्टर जीना यांच्यानंतरच्या काळातील सर्वांत लोकप्रिय व्यक्तिमत्त्व. साहजिकच जनसंपर्क आणि राजकारण यांचे बाळकडू बेनझीर आणि तिच्या भावांना घरातच मिळाले. बेनझीर यांनी शालेय शिक्षण कराचीमध्ये पूर्ण केले. उच्च शिक्षण मात्र अमेरिका आणि इंग्लडमध्ये राहून पूर्ण केले. 1969 ते 73 मध्ये अमेरिकेतील रेडक्लिफ महाविद्यालयामध्ये शिक्षण पूर्ण करून हॉवर्ड विद्यापीठाची पदवी संपादन केली. आपल्याला आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवायचा आहे, हे महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी निश्चित केले होते. त्यामुळे फक्त विद्यापीठ पातळीवर किंवा विद्यार्थी चळवळीत काम करण्यापेक्षा "फाय केपा बेटा'या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवून 1974 मध्ये त्यांनी विजय संपादन केला. या संघटनेमध्ये असे यश मिळविणारी ती पहिली आशियाई महिला होती. त्यानंतर ऑक्सफर्डमध्ये तिने आंतरराष्ट्रीय कायद्यातील पदवी संपादन केली. 1976 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्याही त्या अध्यक्षा बनल्या. अर्थात हा काळ त्यांच्यासाठी ऐषोरामाचा आणि कोणतीही काळजी न करण्याचा होता. 1977 मध्ये परिस्थिती अचानक बदलली. बेनझीरच्या वडिलांना जनरल झिया उल हक यांनी थेट तुरुंगात टाकले. राजकीय वैमनस्यातून 1979 मध्ये त्यांना फाशी देण्यात आले. घरी परतलेल्या बेनझीरना नजरकैद करण्यात आले. तोपर्यंत सत्तेत असलेल्या "पाकिस्तान पीपल्स पार्टी'चे नेतेपद बेनझीरकडे चालत आले. काही काळ आपल्या आईच्या नावाने त्यांनी पक्ष चालविला आणि त्यानंतर स्वतः राजकारणात प्रवेश केला. अर्थात जनरल झिया जिवंत असेपर्यंत म्हणजे त्यानंतरची दहा वर्षे पाकिस्तानमध्ये बेनझीर आणि त्यांच्या पक्षाला वावच मिळाला नाही. 1984 मध्ये बेनझीरने इंग्लंडमध्ये राजकीय आश्रय घेतला. 1988 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि बेनझीरकडे पंतप्रधानपद चालून आले. वयाच्या 35 व्या वर्षी एका मुस्लिम देशाच्या सर्वोच्चपदावर विराजमान होणारी पहिली महिला म्हणून संपूर्ण जगाने त्यांचे कौतुक केले. त्याच वर्षी जगातील सर्वांत सुंदर दिसणाऱ्या पहिल्या 50 महिलांमध्येही त्यांचा समावेश करण्यात आला होता. 1990 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांचे सरकार बरखास्त करण्यात आले; पण भुट्टो यांच्यावर खटला चालविला गेला नाही. 1993 मध्ये भुट्टो पुन्हा सत्तेवर आल्या. त्यानंतर त्यांनी पाकिस्तामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा राबविण्यास प्रारंभ केला. विशेषतः पंजाबी जमीनदारांच्या विरोधात त्यांनी उघडलेली मोहीम त्यांना लोकप्रियता मिळवून गेली; मात्र महिलांना अधिकार मिळवून देण्याच्या त्यांच्या घोषणा हवेतच विरल्या. तीन वर्षांनी त्यांचे सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पुन्हा बरखास्त केले गेले. या वेळेस भुट्टो आणि त्यांचे पती असिफ अली झरदारी यांना अटक करण्याचे आदेशही देण्यात आले. त्या वेळेस भुट्टो यांनी दुबईमध्ये आश्रय घेतला. त्यांच्या पतीला मात्र तुरुंगाची हवा खावी लागली. दरम्यानच्या काळात जनरल परवेझ मुशर्रफ यांनी सत्ता संपादन केली होती. 2002 मध्ये त्यांनी घेतलेल्या निवडणुकीत भुट्टो यांच्या पक्षाला 80 जागांवर विजय मिळाला; पण या पक्षातच फूट पाडण्यामध्ये मुशर्रफ यांनी यश मिळविले आणि स्वतःची सत्ता अबाधित राखली. 2004 पासून बेनझीर यांनी दुबईतून पाकिस्तानच्या राजकारणामध्ये पुन्हा सक्रिय होण्यास प्रारंभ केला. विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून त्यांनी मुशर्रफ यांच्या लष्करी राजवटीला विरोध केला; मात्र दुसऱ्या बाजूला त्या मुशर्रफ यांच्या संपर्कातही होत्या. आता पुन्हा एकदा निवडणुकीची चाहूल लागल्यावर त्या पाकिस्तानमध्ये दाखल झाल्या आहेत. दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी त्यांचे "स्वागत'ही झाले आहे. त्यांच्या पुढील आव्हाने कठीण आहेतच. मुशर्रफ यांच्याबरोबरच त्यांना माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशीही सामना करावा लागणार आहे. पाकमधील सत्तेतून दूर होऊनही त्यांना तब्बल दहा वर्षे उलटून गेली आहेत. या स्थितीत त्या पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधानपद मिळविणार का, हाच प्रश्न आहे. ----------- पराग करंदीकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment