Friday, October 26, 2007
"युवराज' -
भारतीय राजकारणाच्या इतिहासामध्ये नेहरू- गांधी घराण्याचे महत्त्व नव्याने सांगण्याची गरज नाही. गेली अनेक दशके या देशातील जनतेच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे घराणे म्हणून त्यांची ओळख आहे. सत्तेत असो किंवा नसो, या घराण्याचे स्थान गेली अनेक दशके आहे तसेच आहे. या घराण्यातील पाचव्या पिढीचा प्रतिनिधी- राहुल गांधी- सध्या उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये आपली ताकद अजमाविण्याचा प्रयत्न करतो आहे. भारतीय राजकारणाचा "युवराज' म्हणून त्याची ओळख करून देण्यात येते आहे. राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये गेल्या दोन-अडीच वर्षांपासून लक्ष घालायला सुरवात केली. वास्तविक 2004 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठीमधून निवडणूक जिंकली, त्याच वेळेस राजकारणातील त्यांची वाटचाल कोणत्या दिशेने असणार, त्याची चाहूल लागली होती. अर्थात राहुल, हे नेहरू गांधी घराण्याचा वारसदार असले, तरीही आत्तापर्यंत कायम लोकांपासून आणि माध्यमांपासूनही दूर राहिले आहेत. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र हे चित्र बदलते आहे. राहुल लोकांमध्ये मिसळत आहेत आणि त्यांच्या या नव्या पवित्र्याने मुख्यमंत्री मुलायमसिंह यादवांपासून सर्वांनाच चिंतेत टाकले आहे. राहुलना हे नवे नाही. प्रसिद्धीपासून कितीही लांब राहण्याचा त्याचा प्रयत्न असला, तरीही केवळ घराण्याच्या नावामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीची बातमी होते. अगदी शालेय जीवनापासून हा अनुभव आहे. दिल्लीच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये आणि त्यानंतर सेंट कोलंबियामध्ये राहुलनी शाळेचे काही धडे गिरविले खरे; पण इंदिरा गांधींच्या हत्येनंतर मात्र सुरक्षेच्या कारणांमुळे पुढचे शिक्षण घरीच पूर्ण करावे लागले आहे. आपली आजी, वडील आणि काका यांच्यात आणि राहुलमध्ये हे असे शिक्षण हे एक साम्य आहे. राजीव व संजीव गांधीच्याच डून स्कूलमध्ये राहुल गेल्याची नोंद काही ठिकाणी आहे, मात्र त्यांच्या अधिकृत माहितीमध्ये त्याचा समावेश नाही. शालेय शिक्षणानंतर राहुलचा कॉलेज प्रवेशही गाजला होता. दिल्लीच्या सेंट स्टीफन मध्ये गुणवत्ता नसतानाही, त्यांना प्रवेश देण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला. राहुल गांधी यांनी नेमबाजीमध्ये प्रावीण्य मिळविले असून, खेळाडूंसाठी राखून ठेवण्यात आलेल्या जागेतून त्यांना प्रवेश देण्यात आल्याचा खुलासा करण्यात आला. राहुल गांधींचे नेमबाजीतील प्रावीण्य याच निमित्ताने देशाला कळले! त्यानंतर राहुलने आपल्या वडिलांप्रमाणेच हॉवर्डमध्ये प्रवेश घेतला. त्या ठिकाणी 1991 ते 94 दरम्यान चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला असला, तरीही त्यांना विद्यापीठाची पदवी मात्र मिळाली नाही. अखेर 1994 मध्ये त्यांनी फ्लोरिडातील रोलिन्स कॉलेजमध्ये आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर राहुल गांधी पुढच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठाच्या टिनिट्री महाविद्यालयामध्ये दाखल झाले. या महाविद्यालयात आपले पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्यांचे मैत्र एका स्पॅनिश मुलीशी जमले. भारतातील माध्यमांनी या बाबतीतही राहुल आपल्या वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकून एका परदेशी मुलीशी विवाह करीत असल्याला भरपूर प्रसिद्धी दिली होती. ही मुलगी वेट्रेस म्हणजेच हॉटेलमध्ये काम करणारी असल्याचेही प्रसिद्ध करण्यात आले होते. अखेर राहुल गांधींनी आपल्या आयुष्यातील पहिली मुलाखत देऊन आपली मैत्रीण वास्तुविशारद असल्याचा खुलासा केला होता. सोनिया गांधींनी राजकारणामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राहुल भारतात परतले. सोनियांनी राजकारणामध्ये जाण्यास त्यांचा विरोध होता. मात्र परिस्थितीच्या रेट्यापुढे त्यांचे चालले नाही. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये प्रियांका गांधी या सोनिया गांधींबरोबर राजकारणात सक्रिय होत होत्या. त्या वेळेस नेहरू-गांधी परिवाराचा वारस म्हणून प्रियांकाच राजकारणात येणार अशीही अटकळ बांधण्यात येत होती. 2004 च्या लोकसभा निवडणुकीने मात्र या चर्चेला पूर्णविराम दिला. अमेठीमधून राहुल गांधींनी लोकसभेत प्रवेश करतानाच आपणच खरे वारसदार असल्याचे सिद्ध केले. उत्तर प्रदेशला देशाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे. नेहरू-गांधी परिवारातील यापूर्वीच्या चारही पिढ्यांनी याच प्रदेशातील राजकारणावर पकड मिळवून देशावर राज्य केले. आपल्यालाही हेच करावे, लागणार आहे याची जाणीव राहुल गांधींनाही आहे. म्हणूनच या प्रदेशातील मृतवत स्थितीतील आपल्या पक्षामध्ये जीव ओतण्यासाठी ते रस्त्यावर उतरले आहेत. एका अर्थाने ही परीक्षाच आहे. या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये कॉंग्रेसला किती यश मिळेल, यावर राहुल गांधी यांचे भवितव्य अवलंबून नसले, तरीही त्यांच्या राजकीय जीवनाला त्यामुळे वेगळे वळण नक्की मिळू शकेल. मुलायमसिंह, मायावती आणि कल्याणसिंह यांच्यासारख्या कसलेल्या प्रसिस्पर्ध्यांशी दोन हात करताना येणारे राजकीय शहाणपण हेच त्यांचे "युवराज'पदावरून राजा होण्याच्या मार्गावरील मोठे पाऊल असेल. ----------------------- पराग करंदीकर -----------------------
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment