Friday, October 26, 2007

"बॅकबेंचर'

गेली दहा वर्षे ब्रिटनचे पंतप्रधानपद भूषविणारे टोनी ब्लेअर येत्या काही दिवसांमध्ये पदावरून पायउतार होणार आहेत. आपल्या पक्षाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून देणारे मजूर पक्षाचे पहिले पंतप्रधान अशी त्यांची नोंद इतिहासाने यापूर्वीच केली आहे. या सर्व प्रवासामध्ये ब्लेअर यांची कारकीर्द नाट्यपूर्ण अशीच राहिली आहे. त्यांनी मजूर पक्षाच्या पडत्या काळामध्ये आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला आणि या पक्षाला थेट सत्तेपर्यंत मजल मारून दिली. स्कॉटलंड येथे 1953मध्ये जन्मलेल्या ब्लेअर यांचे आई-वडील खरे तर ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक होण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी ऍडलेड विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून कामही सुरू केले होते; पण डरहॅम विद्यापीठाने त्यांना पुन्हा ब्रिटनमध्ये बोलाविले. त्याच काळात टोनी ब्लेअर यांचा जन्म झाला. ब्लेअर यांचे वडील कायद्याचे प्राध्यापक, तर मोठा भाऊ बॅरिस्टर. टोनी ब्लेअर यांनीही कायद्याचाच अभ्यास करावा अशी सर्वांची इच्छा होती; मात्र त्यांचे अभ्यासापेक्षा इतर बाबींमध्येच अधिक लक्ष होते. ब्लेअर हा वर्गातील मागच्या बेंचवर बसून शिक्षकांना त्रास देण्यात आघाडीवर असलेला विद्यार्थी होता, असे त्यांच्या शिक्षकांनी आवर्जून नोंदवून ठेवले आहे. शालेय शिक्षण पूर्ण करून ब्लेअर ऑक्‍सफर्डमध्ये दाखल होण्यासाठी लंडनला आले; पण त्या वेळेस संगीताने त्यांना भारावून टाकले होते. स्वतःचा वाद्यवृंद चालविण्याच्या हेतूने त्यांनी एका वाद्यवृदांचे व्यवस्थापकपदही भूषविले होते. वर्षभर अशा स्थितीत काढल्यानंतर ते ऑक्‍सफर्डमध्ये दाखल झाले. कारण घरून येणारी रसद वडिलांनी बंद करून टाकली होती. ऑक्‍सफर्डमध्ये ते लोकप्रिय विद्यार्थी होते, याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे गिटारवादक आणि त्यांनी स्थापन केलेला "अग्ली रुमर्स' हा वाद्यवृंद स्थापन केला. दुसऱ्या वर्गातून पदवी प्राप्त केल्यानंतर बॅरिस्टर होण्यासाठी ब्लेअर यांनी उमेदवारी सुरू केली आणि त्या ठिकाणी त्यांची गाठ चेरी बूथशी पडली. पुढे टोनी आणि चेरी विवाहबद्ध झाले. ब्लेअर यांच्या कारकिर्दीला या विवाहाने वेगळे वळण दिले. त्यांच्या अभिनेते सासऱ्यांच्या संपर्काचा त्यांना मोठा फायदा झाला. बॅरिस्टर झाल्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये उडी घेतली आणि सासऱ्यांच्या शिफारशीने एका पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारीही मिळविली. हुजूर पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघामध्ये त्यांचा पराभव अपेक्षित होताच; पण त्यांनी मिळविलेल्या दहा टक्के मतांनी त्यांना मजूर पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आणले. 1983मध्ये ब्रिटनमध्ये संपूर्ण मतदारसंघांची फेररचना झाली. त्याचा फायदा ब्लेअर यांना झाला. बालपण घालविलेल्या डरहॅम शेजारी सेजफिल्ड नावाचा नवा मतदारसंघ त्यांनी अचूकपणे हेरला आणि आपले सर्व कौशल्य वापरून त्या मतदारसंघातून उमेदवारीही मिळविली. तेव्हापासून आजपर्यंत ब्लेअर याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. ब्लेअर यांनी "हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये प्रवेश केला असला, तरीही त्यांच्या पक्षाने मात्र सपाटून पराभव पत्करला होता. अर्थात ब्लेअर यांच्या दृष्टीने ती इष्टापत्तीच होती. आता आपल्याला वाढायचे असेल तर "सोशल डेमोक्रॅटिक' राहण्यापेक्षा आपल्याला "डेमोक्रॅटिक सोशॅलिस्ट' व्हायला हवे, असे त्यांनी आवर्जून मांडले आणि त्याला पाठिंबा मिळू लागला. 1987 मध्ये "शॅडो कॅबिनेट'मध्ये स्थान मिळविलेल्या ब्लेअर यांनी त्याच काळात कोसळलेल्या शेअर बाजाराचे भांडवल करून आपल्या नेतृत्वाची दखल घेण्यास भाग पाडले होते. 1992च्या निवडणुकीमध्ये त्यांनी किमान वेतनाच्या धोरणाचा पुरस्कार केला. 1994 मध्ये विरोधी पक्षनेतेपद आणि मजूर पक्षाचे नेतृत्व ब्लेअर यांच्याकडे आले. 1995 मध्ये त्यांनी, पक्षाची धोरणे काळानुसार बदलायला हवीत, असे सांगून अनेक बदल केले. त्याला ब्रिटनवासीयांनी मोठा पाठिंबा दिला. 1997 मध्ये जॉन मेजर यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाऐवजी नागरिकांनी ब्लेअर यांच्या मजूर पक्षाकडे सत्तेची किल्ली सोपविली. तेव्हापासून आजपर्यंत ब्लेअर पंतप्रधान आहेत. याच काळात दहशतवादाच्या विरोधातील लढ्यात त्यांनी अमेरिकेच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यावर नेल्सन मंडलांसारख्या नेत्यानेही कडाडून टीका केली. पण ब्लेअर आपल्या निर्णयावर ठाम होते. सत्तेत आल्यानंतर सर्वाधिक प्राधान्य शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रांना देण्याची त्यांची घोषणेने त्यांना आजपर्यंत कायम लोकप्रियतेच्या लाटेवर ठेवले आहे. यामधूनच अधेमध्ये तेथे स्थायिक झालेल्या भारतीय व आशियाई व्यावसायिकांच्या विरोधातील निर्णयही घेतले गेले. गेल्या महिन्यात त्यांनी आपण पंतप्रधानपद आणि पक्षाचे नेतेपद सोडणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार त्यांनी राजीनामाही दिला आहे. जूनच्या अखेरीस ते या जबाबदारीतून मुक्त होतील. अर्थात राजकारणात या पुढेही ते सक्रिय असणार आहेत. -- पराग करंदीकर ......................

No comments: