Friday, October 26, 2007
विंगेतून बाहेर! -
ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून अखेर गॉर्डन ब्राउन यांनी सूत्रे स्वीकारली. गेले एक दशक ते या पदाच्या प्रतीक्षेत विंगेत उभे होते. गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांच्या मजूर पक्षाने टोनी ब्लेअर यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळविला आहे. त्यात त्यांचाही वाटा होता. आता मात्र त्यांना स्वतःला ही जबाबदारी पार पाडावयाची आहे. अर्थात त्यांच्या दृष्टीने ही अवघड गोष्ट नाही. अगदी विद्यार्थिदशेपासूनच ब्राउन यांनी प्रत्येक अवघड गोष्ट सहजपणे करून दाखविली आहे. समाजसेवेचा वारसा त्यांनी आपल्या वडिलांकडून घेतला. त्यांचे वडील हे चर्चच्या माध्यमातून समाजसेवा करीत असत. अभ्यासात त्यांना गती होती. एका वर्षामध्ये दोन इयत्ता पास करण्याचा धडाका त्यांनी लावला. त्यांचा हा झपाटा पाहून एडिंगबर्ग विद्यापीठाने वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांना प्रवेश दिला. अभ्यासाबरोबरच रग्बी खेळण्याकडे त्यांचा विशेष ओढा होता. मात्र, खेळताना एकदा डोळ्यालाच दुखापत झाल्यामुळे त्यांना तो खेळ सोडून द्यावा लागला. 1965 ते 70 या कालावधीमध्ये त्यांनी एम. ए. अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याच वेळेस या विद्यापीठामध्येही त्यांनी अनेक विक्रम नोंदविले. वयाने सर्वांत लहान विद्यार्थी प्रतिनिधी होण्याच्या विक्रमाचाही त्यात समावेश होता. याच काळात त्यांनी "पीएचडी'साठीही नाव नोंदविले होते. मजूर पक्षाच्या इतिहासावर संशोधन करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, आयुष्यात पुढे काय करायचे याचा निर्णय मात्र त्यांनी घेतला नव्हता. याच काळात ते प्रारंभी एडिंगबर्ग विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून काम करू लागले. पुढे ग्लासगो विद्यापीठातही त्यांनी अध्यापन केले. दुसरीकडे मजूर पक्षाचे पूर्ण वेळ काम करण्याची इच्छा स्वस्थ बसून देत नव्हती. त्या काळामध्ये ब्रिटनमध्ये दूरचित्रवाणी माध्यमांनी जनमानसावर चांगलीच पकड मिळविली होती. त्या क्षेत्रात काम करून बघावे म्हणून ब्राउन यांनी "स्कॉटिश टेलिव्हिजन'मध्ये तीन वर्षे पत्रकारिताही केली. 1979 मध्ये मजूर पक्षाने त्यांना उमेदवारी दिली; पण त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी आपले संशोधन पूर्ण करून 1982 मध्ये "पीएचडी' पूर्ण केली. 1983 मध्ये टोनी ब्लेअर यांच्याच बरोबर ब्राउन यांनीही ब्रिटनच्या संसदेत प्रवेश केला. ब्लेअर यांना त्यांच्या सासऱ्यांचा पाठिंबा होता, तर ब्राउन यांना त्यांच्या हुशारीचे वलय होते. निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघातील बेरोजगारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. त्याच वेळेस त्यांच्या पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर भविष्यामध्ये मोठी जबाबदारी टाकण्याचे निश्चित केले होते. अर्थशास्त्राचा त्यांचा अभ्यास पाहून पहिल्यापासूनच त्यांना शॅडो मंत्रिमंडळात सचिव व पुढे मंत्री म्हणून स्थान देण्यात आले. स्मिथ यांच्या निधनानंतर मजूर पक्षाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी ब्लेअर आणि ब्राउन या जोडीकडे आली. त्याच वेळेस ब्लेअर यांनी त्यांच्यापुढे समझोत्याचा प्रस्ताव मांडला. आपल्याला पंतप्रधान होण्यास ब्राउन यांनी विरोध न केल्यास त्यांना अर्थमंत्रिपद देण्याची तयारी त्यांनी दाखविली. ब्लेअर यांची राजकीय वर्तुळातील आणि मजूर पक्षातील उच्चपदस्थांबरोबर असलेली पोच सर्वांनाच माहीत होती. त्यामुळे ब्राउन यांनी हा प्रस्ताव स्वीकारीत, ब्लेअर यांना पाठिंबा दिला. त्यानंतरचा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. ब्रिटनमध्ये "10 डाउनिंग स्ट्रीट' हे पंतप्रधानांचे निवासस्थान आहे. त्याच्याच शेजारी म्हणजे 11 डाउनिंग स्ट्रीट येथे अर्थमंत्र्यांचे निवासस्थान आहे. ब्लेअर आणि ब्राउन यांच्यातील मैत्री इतकी होती, की प्रत्यक्षात ब्लेअरच दोन्ही घरांमध्ये राहत होते. तोपर्यंत अविवाहित असलेले ब्राउन शेजारी असलेल्या एका छोटेखानी घरात मुक्काम करीत होते. ब्लेअर आणि ब्राउन यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या वावड्या अनेकदा उठल्या; पण जाहीरपणे या दोघांनीही त्याला पुष्टी दिली नाही. आपल्यानंतर पंतप्रधानपदाची सूत्रे ब्राउन यांच्याकडे जाऊ नये यासाठी ब्लेअर यांनी प्रयत्न केल्याचेही सांगितले जाते; पण ब्राउन यांनी हा सर्व विरोध मोडून काढला आणि अनेक वर्षे वाट पाहावे लागलेले आपले स्वप्न पूर्ण केले. अर्थात, त्याआधी तब्बल एक दशक देशाचे अर्थमंत्रिपद सांभाळण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर जमा झाला आहेच. बॅंक ऑफ इंग्लंडला स्वायत्तता देण्यासारखा धाडसी निर्णय त्यांनी घेतलाच; पण जागतिक मंदीच्या काळातही ब्रिटनची अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्याची त्यांची कामगिरी विशेष ठरली. अर्थमंत्र्यांचे निवासस्थान ते पंतप्रधानांचे निवासस्थान या दोन घरांमधील कुंपण ओलांडण्यासाठी त्यांना एक दशकाचा कालावधी लागला असला, तरी यापुढच्या काळात तेथेही सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम ते करणार, हे पाहावे लागेल. ---------------------
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment