Friday, October 26, 2007
महापद्मपती अनिल
रिलायन्स आणि अंबानी ही दोन नावे आज भारतातील जवळपास प्रत्येक मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या तोंडात आहेत. भारतातील सर्वांत श्रीमंत कुटुंबांची यादी केली, तर त्यामध्ये या कुटुंबाचे नाव अग्रस्थानी असेल. अनिल अंबानी यांनी गाठलेला "महापद्मपती'चा टप्पा म्हणूनच भारतीय माध्यमांच्या दृष्टीने बातमीचा विषय ठरला आहे. अर्थात बातम्यांमध्ये राहणे अनिल अंबानींना नवीन नाही. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रिलायन्स उद्योगसमूहामध्ये दाखल झाल्यापासून प्रसिद्धीचा झोत सातत्याने स्वतःवर ठेवण्यात ते कमालीचे यशस्वी ठरले आहेत. स्वातंत्र्यानंतर भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्यांची यादी धीरूभाई अंबानी यांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. देशातील टाटा, बिर्ला, गोदरेज या नामवंत उद्योगांच्या तोडीचाच नव्हे, तर त्याहीपेक्षा सरस असा उद्योगसमूह अंबानींनी उभा करून दाखविला. त्यासाठी त्यांनी साम, दाम आदी सर्व मार्ग वापरले, असे त्यांच्यावर काढण्यात आलेल्या चित्रपटामध्येही दाखविण्यात आले आहे. पण अंबानींच्या या साम्राज्याला आधुनिकतेची जोड दिली ती त्यांच्या दोन मुलांनी. मुकेश आणि अनिल अंबानी यांनी रिलायन्सची सूत्रे हातात घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने रिलायन्सने अनेक विक्रम नोंदविले. त्यामुळे या उद्योगसमूहाच्या उभारणीमध्ये या दोघांचा असलेला सहभागही निश्चित महत्त्वाचा मानला पाहिजे. मुंबईमध्येच आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनिल अंबानी यांनी परदेशातून "एमबीए'ची पदवी मिळवली आणि 1982 मध्ये ते रिलायन्समध्ये दाखल झाले. तोपर्यंत धीरूभाई आणि मुकेश अंबानी यांनी रिलायन्सला देशातील सर्वांत मोठी सिंथेटिक कापड तयार करणारी कंपनी असल्याचा लौकिक मिळवून दिला होता. मात्र तो टिकवायचा असेल, तर रिलायन्सला फक्त भारतामध्येच नव्हे, तर परदेशांतील भांडवल बाजारातूनही निधी उभा करावा लागेल, हे त्यांनी ओळखले होते. रिलायन्सला परदेशांमधील बाजारात पत मिळवून देण्यामध्ये अनिल अंबानींचा सर्वांत मोठा वाटा होता. अब्जावधी डॉलरचे भांडवल त्यांनी रिलायन्सला मिळवून दिले. याच काळात त्यांनी अभिनेत्री टीना मुनीमबरोबर केलेला विवाहदेखील असाच चर्चेचा विषय ठरला होता. तोपर्यंत टीना मुनीमचे नाव संजय दत्तपासून थेट राजेश खन्नापर्यंत अनेकांबरोबर जोडले जात होते. याच काळात अनिल अंबानींचे तिच्याशी मैत्र जुळले आणि त्याची परिणती विवाहात झाली. दुसरीकडे अनिल अंबानी यांची घोडदौड सुरूच होती. परदेशामध्ये अशाच एका भांडवलदाराबरोबर चर्चा करताना त्याने, अनिल अंबानी यांना वाढलेल्या वजनाबद्दल खिजविले. त्या वेळी अंबानी यांचे वजन 115 किलो होते. "तुमच्याकडे पाहिल्यानंतर माझी गुंतवणूक सुरक्षित आहे, असे मला वाटत नाही,' असे त्याने अंबानी यांना सुनावले होते. तो "अपमान' अंबानींच्या जिव्हारी लागला. त्यानंतर त्यांनी वजन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर त्यांचे तंदुरुस्तीचे वेड एवढे वाढले, की त्यांनी 42 किलोमीटरच्या मॅरेथॉन शर्यतीमध्येही सहभागी होण्याची तयारी केली. अनिल अंबानी यांची अमिताभ बच्चन आणि अमरसिंह यांच्याशी असलेली मैत्री हेदेखील भल्याभल्यांना न उलगडलेले कोडे आहे. अमरसिंह यांच्या आग्रहामुळे अनिल अंबानी यांनी समाजवादी पक्षाकडून राज्यसभेचे सदस्यत्व स्वीकारले; तसेच उत्तर प्रदेशामध्ये विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर अनिल आणि मुकेश या बंधूंमध्ये मतभेद झाले आणि रिलायन्स उद्योगसमूहाची विभागणी झाली. भावाभावांमध्ये भांडण झाल्यानंतर अनेक घरांमध्ये प्रगती थांबते, असे म्हणतात; पण अंबानी बंधूंनी ही म्हण खोटी ठरविली आहे. विभागणीच्या वेळी अनिल अंबानी यांच्या वाट्याला तुलनेने नवख्या कंपन्या आणि मुकेश अंबानी यांच्यापेक्षा काही हजार कोटी रुपयांची कमी मालमत्ता आली होती. मात्र, अवघ्या तीन-चार वर्षांमध्ये त्यांनी आपल्या भावाला गाठण्याची तयारी सुरू केली आहे. भारतातील इतर नामवंत उद्योगपती या संपत्तीच्या शर्यतीत मागे पडले आहेत. नुकतेच अनिल अंबानी हे नवे "महापद्मपती' असल्याचे जाहीर झाले आहे. अर्थात, भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करीत असताना, त्यांनी हा टप्पा गाठणे यात नवीन काही नाही; पण त्याच अर्थव्यवस्थेमध्ये इतर उद्योगपतींना मात्र या वेगाने प्रगती करणे शक्य झालेले नाही, या वास्तवाकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. भारतीय उद्योग क्षेत्रातील सर्वोत्तम कार्यकारी अधिकारी, असा किताब सलग सहा वर्षे मिळविलेल्या अनिल अंबानी यांच्या दृष्टीने "महापद्मपती' होणे हा फक्त एक टप्पा आहे, इतकेच. ---------------- पराग करंदीकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment