Friday, October 26, 2007

आव्हानवीर

"चौसष्ट घरां'चा अनभिषिक्त सम्राट असा लौकिक असलेला रशियाचा ग्रॅंडमास्टर गॅरी कास्पारोव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, तो रशियाचे अध्यक्ष वाल्दिमिर पुतीन यांना आव्हान देण्यासाठी थेट रस्त्यावर उतरल्यामुळे. अर्थात, कास्पारोवचा हा संघर्ष नवा नाही; किंबहुना संघर्ष हा त्याचा स्वभाव आहे. त्यातूनच सलग पंधरा वर्षे बुद्धिबळासारख्या खेळाचे जागतिक विजेतेपद स्वतःकडे राखण्याची किमया त्याने घडवून दाखविली आहे. कास्पारोवची संपूर्ण कारकीर्द अशीच विस्मयकारक आहे. त्याची आई आर्मेनियन, तर वडील ज्यू. वयाच्या सातव्या वर्षी वडिलांचे छत्र गमाविण्यापूर्वी गॅरीने त्यांच्याकडून बुद्धिबळाचे पाठ गिरविण्यास प्रारंभ केला होता. त्याची या खेळातील गती सर्वांनाच चकित करणारी होती. वयाच्या आठव्या वर्षी सरकारी नियमानुसार त्याची रवानगी सरकारी बुद्धिबळ अकादमीमध्ये करण्यात आली. कम्युनिस्ट रशियन राजवटीमध्ये बुद्धिबळाला मोठी प्रतिष्ठा होती. "कॅच देम यंग' हे तत्त्व खऱ्या अर्थाने राबविण्यात येत होते. व्लादिमिर मॅकोगोनावसारख्या गुणी प्रशिक्षकाने गॅरीमधील हिऱ्याला खऱ्या अर्थाने पैलू पाडले. या अकादमीत त्याने आत्मसात केलेला कॅरो कॅन बचाव पुढे आयुष्यभर त्याचा खंदा "साथीदार' बनला. 1978 मध्ये गॅरी कास्पारोवला रशियन राष्ट्रीय स्पर्धेसाठी निमंत्रण देण्यात आले. हे निमंत्रण मिळणारा तो सर्वांत तरुण खेळाडू होता. त्यापूर्वी त्याच्या नावाचा करिष्मा बुद्धिबळाच्या जगतामध्ये सर्वांनाच माहिती झाला होता. 1979मध्ये त्याने ग्रॅंडमास्टरसाठीचा पहिला नॉर्म पूर्ण केला आणि त्यानंतर 21 वर्षे तो या पटावर राजा बनून राहिला. 1980मध्ये कुमारांचे जागतिक विजेतेपद मिळवून त्याने जगाला आपली ओळख पटवून दिली. या विजेतेपदाने बुद्धिबळ ऑलिंपियाडचे दरवाजे त्याला उघडले. 1984मध्ये अनातोली कार्पोव आणि कास्पारोव यांच्यातील जागतिक विजेतेपदाची लढत खूप गाजली. 48 सामन्यांच्या या महालढतीत कास्पारोव जिंकला खरा; पण त्यामध्येही वाद झालाच. इतक्‍या दीर्घ लढतीचा खेळाडूंच्या स्वास्थावर परिणाम झाला आहे, असे सांगून "फिडे'ने हा निकाल जाहीर करण्यास नकार दिला होता. ती वस्तुस्थितीही होती, कारण कार्पोवचे वजन दहा किलोने घटले होते. अखेर 1985मध्ये 24 सामन्यांच्या लढतीत साडेबारा गुण प्रथम मिळविणारा खेळाडू विजेता घोषित करण्यात येईल, असे "फिडे' या संघटनेने जाहीर केले होते. कास्पारोवने ही लढत 13 विरुद्ध 11 अशी जिंकून निर्विवादपणे जागतिक विजेतेपद मिळविले. 1986मध्ये कार्पोवने दिलेले आव्हान त्याने पुन्हा परतावून लावले. कास्पारोवने "फिडे' या संघटनेचे सदस्य असलेल्या खेळाडूंची संघटना स्थापन करून या मूळ संघटनेलाच आव्हान देण्याचा प्रतापही केला. 1993मध्ये अखेर फिडेने त्याची हकालपट्टी केली. त्या स्थितीतही 1995मध्ये विश्‍वनाथन आनंदचे आव्हान परतावून लावून त्याने आपले जागतिक विजेतेपद कायम राखण्यात यश मिळविले होते. त्यानंतर त्यांनी "फिडे'ला समांतर अशी जागतिक बुद्धिबळ संघटना स्थापन करून वेगळी जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धा भरविण्याचा प्रयत्नही केला.2000मध्ये म्हणजे शतक सरताना व्लादिमिर क्रामनिकने त्याला पराभूत करून त्याची सद्दी संपविली; पण त्यापूर्वी सलग पंधरा वर्षे तो विश्‍वविजेता राहिला. त्यानंतरही काही स्पर्धांत तो धडाकेबाज विजय मिळवित राहिला, पण 2005मध्ये त्याने लिनारेस स्पर्धेत विजय मिळविल्यानंतर बुद्धिबळातून निवृत्ती जाहीर केली. एकीकडे बुद्धिबळातील कारकीर्द सुरू असतानाच कास्पारोवने राजकारणामध्येही आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. 1984मध्ये त्याने कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले होते. 1993मध्ये चॉईस ऑफ रशिया नावाचा नवा पक्ष स्थापन करण्यात त्याने पुढाकार घेतला होता. त्यानंतर बोरिस येत्सिन यांचा तो खंदा समर्थक बनला. परवा, मार्च महिन्यात सेंट पिटर्सबर्गच्या गव्हर्नरांच्या धोरणांना थेट आव्हान देण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांना त्याने पाठिंबा दिला होता. 14 एप्रिलला त्याला मास्को पोलिसांना काही काळासाठी अटकही केली होती. एक हजार रुबल दंड भरून त्याची सुटका झाली आहे. यापुढच्या काळातही आपला लढा असाच कायम ठेवण्याचा निर्धार त्याने केला आहे. "फिडे'बरोबरचा त्याचा लढा पाहिला, की तो किती चिवटपणे लढा देतो ते समजून येते. यापुढच्या काळात, राजकारणातही त्याने सम्राटपद मिळविले तर आश्‍चर्य वाटू नये. ----------- पराग करंदीकर

No comments: