Friday, October 26, 2007
दक्षिण "ध्रुव'
राजकारणामध्ये सलग पन्नास वर्षे अपराजित राहणे, ही सोपी गोष्ट नाही. त्यातही तमिळनाडूसारख्या प्रदेशामध्ये जिथे मतदार आपल्या भावना मतपेटीतून टोकाला जाऊन व्यक्त करतात, तिथे ही किमया करणे आणखी अवघड. मात्र, तमिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांनी ती करून दाखविली आहे. पाचव्यांदा मुख्यमंत्रिपद भूषवीत असलेल्या करुणानिधी यांनी 1957 मध्ये तमिळनाडूच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकले, ते आतापर्यंत कायम आहे. तीन जून 1924 रोजी तत्कालीन तंजावर जिल्ह्यात जन्मलेल्या करुणानिधी यांचा प्रवास थक्क करणारा आहे. वयाच्या 14 व्या वर्षी अलिगिरी स्वामींच्या भाषणाने प्रभावित होऊन राजकारणामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कविता, कादंबरी, चित्रपट यांच्या लिखाणासाठी लागणारी सर्जनशीलता जपत गेली साठ वर्षे ते यशस्वीपणे राजकारण करीत आहेत. अलिगिरीस्वामी हे तेव्हा जस्टिस पार्टीचे नेते होते आणि त्या काळात तमिळनाडूमध्ये लाट होती ती हिंदीविरोधी आंदोलनाची. काहीही झाले तरी आपली मातृभाषा सोडून हिंदीचा स्वीकार करायचा नाही, असा संकल्प तेव्हा तेथील अनेकांनी केला होता. करुणानिधी हे त्यांच्यापैकीच एक. आजही राजकीय भाषण असो किंवा प्रतिक्रिया, तमीळमधूनच देण्याबाबत ते आग्रही असतात आणि तथाकथित राष्ट्रीय वाहिन्यांवर त्यांचा हा आग्रह चालतो. विद्यार्थी दशेमध्ये आंदोलनामध्ये उतरणाऱ्या करुणानिधी यांनी त्या वेळेस स्वतःचे हस्तलिखित वर्तमानपत्र काढले होते. पुढे याच दैनिकाचे "मुरासोली' या दैनिकात रूपांतर करण्यात त्यांनी यश मिळविले. हेच वर्तमानपत्र पुढे त्यांच्या पक्षाचे मुखपत्रही ठरले. स्वातंत्र्याची चाहूल लागताच जस्टिस पार्टीचे रूपांतर द्रविड कळगममध्ये करण्याचा निर्णय तेव्हाचे या पक्षाचे नेते पेरियार यांनी घेतला. त्यांच्यासोबत करुणानिधी होतेच. पक्षाचा नवीन ध्वज तयार करताना त्यावरील लाल गोल स्वतःच्या रक्ताने रंगविण्याचा त्यांचा उद्योग त्या वेळेसही त्यांना प्रसिद्धी देऊन गेला होता. याच वेळेस त्यांनी विविध चित्रपटांच्या कथा लिहिण्यासही प्रारंभ केला होता. संपूर्णपणे भारलेल्या दिवसांमध्ये करुणानिधी यांचे ऐतिहासिक आणि सामाजिक आशयांवरील चित्रपट तमीळ नेत्यांनी डोक्यावर घेतले नसते, तरच नवल होते. पुढे याच लोकप्रियतेचा फायदा त्यांनी राजकारणामध्ये आपले बस्तान बसविण्यासाठीही करून घेतला. वयाच्या विसाव्या वर्षी "राजकुमारी' या चित्रपटाच्या लिखाणाने प्रारंभ करणाऱ्या करुणानिधी यांच्या नावावर तब्बल 70 चित्रपट आणि विविध स्वरूपातील सुमारे 100 पुस्तके जमा आहेत. मुरासोली या दैनिकामध्ये गेली पन्नास वर्षे ते सातत्याने स्तंभलेखन करीत आहेत. करुणानिधी यांची राजकीय वाटचाल ही अनेक अडथळ्यांची आहे. राजकारणामध्ये घराणेशाहीला पर्याय नसतो असे सांगितले जाते. करुणानिधींचाही घराणेशाहीवर पूर्ण विश्वास आहे. त्यांचे दोन मुलगे राजकारणामध्ये सक्रिय आहेतच; पण त्यांचे पुतणे कै. मुरासोली मारन यांनीही राष्ट्रीय राजकारणामध्ये आपली छाप उठविली ती करुणानिधी यांच्या सहकार्यानेच. मारन यांच्या मुलाने वाढविलेला चित्रपटवाहिन्यांचा उद्योगालाही करुणानिधींचा आशीर्वाद असल्याने या सर्वांचे राष्ट्रीयीकरण करावे, अशी मागणी तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी केली होती. मारन यांच्या चिरंजीवांनी करुणानिधींच्या आशीर्वादाने अब्जावधींची माया गोळा केली आहे. परवा हल्ला झालेले "दिनकरन' हे वर्तमानपत्र मारन यांच्याच मालकीचे आहे. इतक्या यशस्वी राजकारण्याचा सत्कार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या समारंभापूर्वी परवा मदुराईमध्ये नाट्य घडले आणि त्यापाठोपाठ काल दिल्लीतील मंत्रिमंडळातून दयानिधी मारन यांनी राजीनामाही देऊ केला आहे. या सर्वांसाठी मदुराईची घटना हे निमित्त सांगितले जात असले तरीही करुणानिधी आपले चिरंजीव स्टॅलिन यांच्या वाटेत येणारे काटे पद्धतशीरपणे बाजूला काढत असल्याचीच चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. दुसऱ्या बाजूला जयललिता आणि करुणानिधी यांच्यातील वैरही सर्वश्रुत आहे. 2001 मध्ये मध्यरात्री करुणानिधी यांना अटक करण्याचा प्रसंग आजही अनेकांच्या नजरेसमोर आहे. त्या सर्वांचा आपल्या राजकारणासाठी फायदा कसा करून घ्यायचा हे करुणानिधी यांना माहिती आहे. वेळ येताच भाजपला सोडून कॉंग्रेसशी जवळीक करण्याचा त्यांचा डावही असाच यशस्वी ठरला आहे. मात्र, या सर्वांमध्ये करुणानिधी मात्र घट्टपणे पाय रोवून उभे आहेत, एखाद्या ध्रुवाप्रमाणे. -------------- पराग करंदीकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment