Friday, October 26, 2007
करारी कारत
एके काळी संपूर्ण देशावर निर्विवादपणे सत्ता गाजविणाऱ्या कॉंग्रेस पक्षाला सध्या मात्र काहीशी दुय्यम भूमिका स्वीकारावी लागते आहे. राष्ट्रपतिपदाची निवडणूक असो किंवा उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपूर्वी उमेदवाराची निवड असो, या प्रत्येक बाबतीत कॉंग्रेसला नमविण्याची किमया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने करून दाखविली आहे. त्यामध्ये आघाडीवर आहेत प्रकाश कारत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सध्या देशातील चेहरा असलेल्या कारत यांनी, अमेरिकेशी करण्यात येत असलेल्या अणुकरारावरून सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांच्या नाकीनऊ आणले आहेत. साठ खासदार असलेल्या डाव्या पक्षांनी गेल्या तीन वर्षांत कॉंग्रेसचे सरकार वेळोवेळी तारले आहेच. आतापर्यंत कधी तरी आक्रमक भूमिका घेऊन त्यांनी आपले अस्तित्व दाखवूनही दिले होते; पण आता थेट सरकार चालविण्याची जबाबदारी आपली नसून, कॉंग्रेसची असल्याचा पवित्रा घेऊन त्यांनी संपूर्ण देशालाच मध्यावधी निवडणुकांच्या तोंडावर आणून उभे केले आहे. या सर्वांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत प्रकाश कारत. 56 वर्षांचे कारत कम्युनिस्ट पार्टीच्या दृष्टीने तरुण नेतृत्व आहे. दोन वर्षांपूर्वी जेव्हा त्यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली, त्याच वेळी कम्युनिस्ट पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली कात टाकेल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. विद्यार्थिदशेपासून राजकारणाशी संबंधित राहिलेल्या कारत यांची वाटचाल त्याच दिशेने आहे. चेन्नईमध्ये जन्म झालेल्या कारतांनी आपल्या कॉलेज जीवनामध्ये अष्टपैलू विद्यार्थी म्हणून लौकिक मिळविला होता. सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यासाठी असलेले सुवर्णपदक मिळविल्यानंतर कारत यांनी पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे ठरविले. घरची स्थिती बऱ्यापैकी असल्याने कारत यांनी ब्रिटनमधील एडिंबर्ग विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. अर्थात, तेथेही त्यांनी विद्यार्थी संघटना बांधण्याचा "उद्योग' केलाच. त्याबद्दल त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थात, काही काळानंतर ही हकालपट्टी रद्द करण्यात आली. दिल्लीत परतल्यानंतर कारत यांनी ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोपालन यांचे सहायक म्हणून काम करण्यास प्रारंभ केला. त्याचबरोबर पुढील शिक्षणासाठी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. या दोन्ही गोष्टी त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण देणाऱ्या ठरल्या. कम्युनिस्ट पक्षाने याच काळात विद्यार्थी संघटना बांधण्याचा निर्णय घेतला. गोपालन यांच्या शिफारशीवरून कारत यांच्याकडे "स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया' या संघटनेचे अध्यक्षपद सोपविण्यात आले. ही संघटना बांधण्यासाठी कारत देशभर फिरले. याच काळामध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली. संपूर्ण वातावरण बदलून गेले. कारत यांच्यासारख्या विद्यार्थी नेत्यांना आयुष्यभर पुरेल इतकी अनुभवाची शिदोरी या आणीबाणीने दिली. याच काळात कधी भूमिगत राहून, तर कधी प्रवासात राहून कारत यांनी आपले काम सुरू ठेवले. संपूर्ण आणीबाणीमध्ये त्यांना आठ दिवस कारावासही भोगावा लागला. पांढरा शर्ट आणि खाकी पॅंट, डोळ्याला चष्मा आणि बारीक कापलेले व भांग न पाडलेले पांढरे केस असा वेश असलेल्या कारतांनी याच दरम्यान वृंदा कारत यांच्याशी प्रेमविवाह केला. वृंदा कारत या अतिशय आक्रमक नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेतच; पण पक्षाच्या व्यासपीठावर प्रकाश कारत त्यांच्यापेक्षाही त्या आक्रमक असतात, असे त्यांचे सहकारी सांगतात. प्रसिद्धिमाध्यमांपासून जाणीवपूर्वक चार हात लांब राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पहिल्यापासून आपल्या पक्षाच्या धोरणांशी अतिशय प्रामाणिक राहात, प्रसंगी विविध नेत्यांना चार बोल सुनावणारे कारत यांना 1985 मध्ये पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान मिळाले. त्यानंतर 1992 मध्ये "पॉलिट ब्यूरो' म्हणजेच पक्षाच्या सर्वोच्च अशा निर्णय समितीमध्ये त्यांना स्थान देण्यात आले. 1996 मध्ये बिगरकॉंग्रेस सरकार स्थापन करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाने आपली धोरणे बाजूला सारण्याची तयारी सुरू केली, तेव्हा कारत यांनी त्या विरोधात जोरदार आवाज उठविला. केवळ कारत यांच्या विरोधामुळेच ज्योती बसू यांची पंतप्रधानपदाची संधी हुकली, असेही बोलले जाते. मात्र, ही टीका कारत यांना नवी नाही. हरकिशनसिंग सुरजित यांनी पक्षाचे सरचिटणीसपद 15 वर्षे सांभाळल्यानंतर 2005 मध्ये आपला वारस म्हणून कारत यांच्याकडे सूत्रे सोपविली. तेव्हापासून मनमोहनसिंग यांच्या सरकारशी त्यांचा "संघर्ष' सुरू आहे. राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निवडताना आपल्याला विचारात न घेतल्याचा राग येऊन त्यांनी कॉंग्रेसला कोंडीत पकडले होते. आता तर अमेरिकेशी केलेल्या अणुकरारावरून त्यांनी कॉंग्रेसच्या नेतृत्वाला चांगलेच अडचणीत आणले आहे. - पराग करंदीकर ----------------
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment