Friday, October 26, 2007

शोधयात्री

पालागुमी साईनाथ (अर्थात पी. साईनाथ) यांना रॅमन मॅगेसेसे पुरस्कार जाहीर होणे, ही भारतातील पत्रकारांच्याच नव्हे, तर साऱ्या देशवासीयांच्या दृष्टीने आनंददायी गोष्ट आहे. साईनाथ यांच्या कामगिरीची जागतिक स्तरावर अशा पद्धतीने नोंद घेतली जाणे, हे आश्‍वासक आहे. पत्रकारिता आणि माध्यमे ही फक्त सत्ताधाऱ्यांच्या किंवा धनदांडग्यांच्या हातातील बाहुले बनत असल्याचा आरोप होत असताना किंवा सध्याची माध्यमे ही वास्तवापासून फार दूर गेलेली आहेत अशी टीका होत असताना, याच माध्यमातील एका प्रतिनिधीने जनसामान्यांच्या प्रश्‍नांवर केलेल्या लिखाणाला मिळालेली ही दाद म्हणूनच महत्त्वाची आहे. साईनाथ यांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी पाहिली, तर हा माणूस ग्रामीण भारताशी स्वतःला एवढा जोडू कसा शकतो, याचे आश्‍चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. राष्ट्रपती वराहगिरी वेंकटगिरी गिरी यांचा हा नातू. संपन्न कौटुंबिक पार्श्‍वभूमी. जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण. असे असल्यावर एखाद्याने परदेशात जाऊन आणखी संपन्न जीवनाची निवड केली असती. किमान भारतात राहून मोठ्या कंपनीमध्ये किंवा प्रशासकीय सेवेत स्वतःला रमविले असते; पण साईनाथ यांनी वेगळा मार्ग निवडला. एका वृत्तसंस्थेमध्ये पत्रकार म्हणून त्यांनी कामास प्रारंभ केला. त्यानंतर दक्षिण आशिया कार्यक्षेत्र असलेल्या एका मासिकासाठी त्यांनी काम करण्यास प्रारंभ केला. दहा-एक वर्षे या मासिकामध्ये त्यांनी काम केले. मात्र या कामातून हवे ते समाधान मिळत नव्हते. सामान्यांचे प्रश्‍न काय आहेत, हे समजावून घेण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे या भावनेतून त्यांनी शोधयात्रा सुरू केली. देशातील सर्वांत मागास अशा नऊ राज्यांमध्ये जास्तीत जास्त पायी फिरून त्यांचे प्रश्‍न समजावून घेणे हा त्यांचा प्रयत्न होता. 1990 नंतर देशामध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले आणि माध्यमांचे लक्ष हे त्यांच्या मुख्य विषयापासून दुसरीकडे जात असल्याची भावना साईनाथ यांच्या मनामध्ये घर करू लागली. भारतातील माध्यमे समाजाच्या वरच्या स्तरातील पाच टक्के लोकांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम करीत असतील, तर तळातील पाच टक्के लोकांच्या समस्यांना मी वाचा फोडण्याचा प्रयत्न करेन, असे त्यांनी लिहून ठेवले आहे. साईनाथ काम करीत असलेल्या "ब्लिट्‌झ' या साप्ताहिकाला त्या वेळेस प्रचंड प्रतिष्ठा होती आणि साईनाथ यांच्या लेखनाला मान्यताही. याच काळामध्ये टाइम्स ऑफ इंडियाची एक अभ्यासवृत्ती त्यांना मिळाली. देशाच्या पाच राज्यांतील दहा गरीब जिल्ह्यांचा अभ्यास करण्याचा निश्‍चय त्यांनी केला. त्यामध्ये सुमारे दहा हजार किलोमीटरचा प्रवास अपेक्षित होता. त्यामध्ये पाच हजार किलोमीटरची पायपीटही होती. या प्रवासातील दिसलेल्या अनेक गोष्टी साईनाथ यांनी परखडपणे मांडल्या. एकीकडे पेज थ्री संस्कृतीचा जोरदार पुरस्कार होत असताना, साईनाथ यांच्या या 84 लेखांकाना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सुमारे दीड वर्षे चाललेली ही शोधयात्रा संपली तेव्हा त्यातून निर्माण झाले ते एक सुंदर पुस्तक, "एव्हरीबडी लव्हज ए गुड ड्राऊट'. तब्बल दोन वर्षे हे पुस्तक भारतामध्ये "बेस्टसेलर' होते. अनेक स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ते "बायबल' ठरले आहे. अर्थात या सर्वांतून मिळालेले उत्पन्न साईनाथ यांनी ग्रामीण भारतातील पत्रकारांच्या शिक्षणासाठी दिले. आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांचा साईनाथ यांनी लावलेला "शोध' हा प्रशासनाच्या नाकर्तेपणावर प्रकाश ठरणारा होता. या जिल्ह्यात सुमारे एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू पोटात दुखल्यामुळे झाल्याची नोंद करण्यात आली होती. ही पोटदुखी म्हणजे कीटकनाशक प्राशन केल्याने होत असल्याचे दडवून ठेवतात आले होते. साईनाथ यांनी ही गोष्ट प्रथम प्रकाशात आणली. पुढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा राष्ट्रीय प्रश्‍न बनला. सध्या साईनाथ दलितांच्या प्रश्‍नांचा असाच अभ्यास करीत आहेत. त्यासाठी देशातील पंधरा राज्यांमध्ये त्यांची भ्रमंती सुरू आहे. साईनाथ यांच्या पत्रकारितेला आता राजमान्यता मिळाली आहे. त्यांच्या लिखाणाची नोंद घेऊन अनेक राज्य सरकार आपल्या धोरणांमध्येही बदल करीत आहेत. त्यांची पत्रकारिता ही पत्रकारितेच्या महाविद्यालयांमधून शिकविली जाऊ लागली आहे. अर्थात याने साईनाथ समाधानी नाहीत. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले असले, तरीही त्यांचा शोध अजूनही थांबलेला नाही. त्यांच्याच म्हणण्यानुसार समाजाच्या तळातील पाच टक्के लोकांच्या आशा आकांक्षांचे नक्की काय होते, ते जगण्याची लढाई कशी जगतात आणि जागतिकीकरणाच्या या पसाऱ्यामध्ये ते कोणत्या आभाळात आपला चंद्र शोधतात, यासाठीची शोधयात्रा या पुढेही सुरूच राहणार आहे. ------------------------- पराग करंदीकर -------------------------

No comments: