Friday, October 26, 2007

शरीफनामा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज पाकिस्तानच्या भूमीवर पाय ठेवला तेव्हा एक वर्तुळ पूर्ण झाले. आठ वर्षांपूर्वी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी शरीफ यांचे सरकार बरखास्त करून पाकची सूत्रे स्वतःकडे घेतली होती. त्यानंतर शरीफ यांनी सौदी अरेबियामध्ये आश्रय घेतला. आता मुशर्रफ यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे. पाकिस्तानात लोकशाही प्रस्थापित व्हावी यासाठी आंदोलने होत आहेत. यंदा निवडणूकही होणार आहे. त्यामुळे मायभूमीत परत येण्याची तयारी शरीफ यांनी सुरू केली होती. न्यायालयानेही त्याला अनुकूलता दर्शविली; मात्र खुद्द मुशर्रफ यांनी शरीफ यांच्या परतण्यास विरोध केला. त्याला न जुमानता शरीफ परतले; पण मुशर्रफ यांनी त्यांना जेद्दाहला परत पाठविले. या चाल-प्रतिचालीत शेवटी विजय कोणाचा होईल हे काळच ठरवेल. शरीफ यांचा जन्म 1949 मधला, लाहोर येथला. त्यांचे वडील महंमद शरीफ हे मूळचे अमृतसरजवळील जती उमरा या गावचे. फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. इत्तेफाक समूहामध्ये ते भागीदार होते. पंजाब आणि सिंध परिसरातील सर्वच शहरांमध्ये या उद्योगसमूहाच्या शाखा होत्या. त्यामुळे फाळणीचे चटके या कुटुंबाला कमी बसले. सर्वस्व गमाविण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. याच वातावरणात शरीफ यांचा जन्म झाला. संपन्न कुटुंबामुळे त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण लाहोरमध्येच विनासायास पार पडले. कडव्या मुस्लिमांबद्दल शरीफ यांच्या मनामध्ये अढी बसली, ती याच काळात. लाहोरच्या विधी महाविद्यालयात असताना शरीफ क्रिकेटमध्येही आपले नशीब आजमावीत होते. पहिल्या दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्यांनी पाकिस्तान रेल्वेचे प्रतिनिधित्वही केले; पण राष्ट्रीय संघामध्ये मात्र त्यांना स्थान मिळविता आले नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरच्या उद्योगामध्ये लक्ष घालत असतानाच त्यांनी पंजाब प्रांतामध्ये राजकारणाचे धडे गिरविण्यास प्रारंभ केला. 1981 मध्ये ते पंजाबचे क्रीडामंत्री झाले. याच काळामध्ये त्यांची गाठ जनरल झिया उल हक यांच्याशी पडली. जनरल झिया यांनी 1985 मध्ये "मार्शल लॉ' लागू केला आणि पंजाबच्या काळजीवाहू मुख्यमंत्रिपदी शरीफ यांची नियुक्ती केली. तोच त्यांचा पाकिस्तानच्या राजकीय राजकारणामधील प्रवेश होता. त्या काळातील लोकप्रिय निर्णयामुळे आणि मुस्लिम लीगसारख्या पक्षाच्या पाठिंब्यामुळे 1988 मध्ये ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. दरम्यानच्या काळात झिया यांचे अपघाती निधन झाले होते, पण तोपर्यंत शरीफ यांनी आपले बस्तान व्यवस्थित बसविले होते. झिया यांच्या निधनानंतरही पाकिस्तानचे पंतप्रधानपद त्यांच्याकडे चालून आले. झिया यांच्याशी जुळवून घेण्यात शरीफ यशस्वी ठरले असले तरीही त्यानंतरच्या लष्करप्रमुखांशी मात्र त्यांचा संघर्षच झाला. 1993 मध्ये तत्कालीन अध्यक्ष गुलाम इसहाक खान यांनी शरीफ यांना पदच्युत करून संसद विसर्जित केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा हा निकाल अयोग्य ठरवून शरीफ यांना पुन्हा पंतप्रधानपदावर बसविले, पण संघर्ष कायम राहिला. दोन महिन्यांनी शरीफ यांनी राजीनामा दिला आणि बेनझीर भुट्टो यांच्याकडे सूत्रे गेली. नंतर चार वर्षांनी झालेल्या निवडणुकीत मात्र शरीफ यांच्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले. बेनझीर भुट्टो यांनी तर हे निकाल "मॅनेज' करण्यात आल्याचा आरोपही केला. शरीफ यांनी सूत्रे स्वीकारली. त्यानंतर तातडीने त्यांनी अध्यक्षांना असलेले विशेष अधिकार रद्द करणारी घटनादुरुस्ती रद्द करून आपल्या डोक्‍यावरील टांगती तलवार दूर करण्यात यश मिळविले. शुक्रवारची साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यासारखे निर्णय घेतल्याने कडव्या मुस्लिम संघटनांचा रोष त्यांना पत्करावा लागला. लाहोर आणि इस्लामाबाद या दोन शहरांना जोडणारा एक्‍स्प्रेस वे पूर्ण करून त्यांनी पाकिस्तानला विकासाचे स्वप्न दाखविले. त्याच वेळेस भारताबरोबरचे संबंधही सुधारण्याचे त्यांनी प्रयत्न केले. अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी त्यांनी लाहोरमध्ये केलेली चर्चा ही या दोन देशांमधील मैत्री पर्व सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक मानली जाते; पण त्याचबरोबर भारताने अणुचाचणी केल्यानंतर त्यांनी तोडीस तोड उत्तरही दिले. परवेझ मुशर्रफ यांची लष्करप्रमुख म्हणून त्यांनीच नियुक्ती केली- तीही काही जणांना डावलून. पण त्यामुळे मुशर्रफ त्यांच्या काबूत राहिले नाहीत. संघर्ष वाढल्यानंतर मुशर्रफ यांना लष्करप्रमुखपदावरून हटविण्याची चाल शरीफ यांनी खेळली. तेही मुशर्रफ परदेशी असताना. मुशर्रफ यांना घेऊन येणारे विमान कराची विमानतळावर उतरू न देण्याचा प्रयत्न त्यांनी केला; पण लष्कर मुशर्रफ यांच्यामागे राहिले आणि लष्करी उठाव यशस्वी झाला आणि पदच्युत होण्याची वेळ शरीफ यांच्यावर आली. मग त्यांना देश सोडून जावे लागले. आज ते पाकिस्तानात आले खरे; पण पुन्हा मुशर्रफ यांनी परत पाठविले. शरीफ यांच्या बाबतीत नशीब आणखी कोणते वळण घेणार हे लवकरच कळेल. ---------------------- पराग करंदीकर ----------------------

No comments: