Friday, October 26, 2007
वादग्रस्त
वाद आणि मणिशंकर अय्यर या खरे तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नुकत्याच झालेल्या आशियायी क्रीडा स्पर्धांच्या यजमानपदाच्या शर्यतीमध्ये अय्यर यांचे एक वाक्य भारताच्या विरोधात गेले आणि ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी त्या बैठकीनंतर जाहीरपणे अय्यर यांचा समाचार घेतला. एके काळच्या खास मित्रांमधील ही "लढाई' पाहून दिल्लीतील अनेक मुत्सद्दी राजकारणीही सध्या गार झाले आहेत. या दोघांमधील वाद मिटविण्यासाठी थेट कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना लक्ष घालावे लागले आहे. अर्थात मणी आणि वाद हे समीकरण फार जुने आहे. मणी जेव्हा भारतीय परकीय सेवेत होते तेव्हापासून, कदाचित त्याही आधीपासून. आपणच वाद तयार करायचा आणि त्यात आपल्याबरोबर इतर अनेकांना अडकवायचे ही त्यांची सवय तशी जुनीच आहे. त्याची पाळेमुळे कदाचित त्यांच्या लहानपणामध्येही असावीत. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे कुटुंब त्या वेळच्या मद्रासला स्थलांतरित झाले आणि तेव्हापासून जीवनाशी संघर्ष सुरू झाला. त्यांचे वडील शंकर अय्यर हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट, तर आई त्या काळात मद्रास सरकारच्या सेवेत होती. आर्थिकदृष्ट्या संपन्न अवस्थेत असतानाच त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आईने मोठ्या हिमतीने आपल्या चार मुलांचा सांभाळ केला. फक्त सांभाळच केला नाही, तर या सर्व मुलांना परदेशात शिक्षण मिळावे यासाठी अपार कष्ट केले. यासाठी त्यांनी आपले कुटुंब सिमल्याला आणि त्यानंतर दिल्लीला हलविले. वडिलांच्या निधनानंतर मिळालेल्या तीन लाख रुपयांच्या विम्यातून या सर्व मुलांचे आयुष्य उभे करण्यासाठी या मातेने अनेक संकटांशी सामनाही केला. याच परिस्थितीत मणी आणि स्वामिनाथन (प्रसिद्ध पत्रकार) हे डून स्कूलमध्ये दाखल झाले. संपूर्ण देशात सर्वोत्तम शिक्षण घेताना, त्यांचा देशातील अनेक नामवंतांशी परिचय झाला. आपल्या हुशारीने त्यानंतर केंब्रिजमध्ये जाऊन उच्च शिक्षण घेतानाही त्यांनी अनेक मित्र जोडले. राजीव गांधी, केनेथ क्लार्क ही त्यातीलच काही नावे. राजीव त्यांच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होते. पुढे भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांची कराची येथील भारतीय उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली. ही कारकीर्द चांगलीच गाजली. त्यावर त्यांनी लिहिलेले पुस्तकही गाजले. एके काळी शाळेत आणि कॉलेजमध्ये मित्र असलेले राजीव गांधी 1985 मध्ये देशाचे थेट पंतप्रधान झाल्यावर अय्यर यांची नियुक्ती थेट त्यांच्या कार्यालयातच करण्यात आली. तेव्हापासून त्यांची राजीव गांधींशी असलेली जवळीक अधिक वाढली; किंबहुना राजीव किचन कॅबिनेटचे ते सदस्यच बनले. राजीव गांधींनी केलेल्या अनेक ऐतिहासिक भाषणांचे लेखन अय्यर यांनीच केलेले असे (राजीव यांचे "उन्हे नानी याद दिलाएंगे.. हे भाषणही अय्यर यांनीच लिहिलेले होते). त्या वेळेस टीव्ही चॅनेलचे प्रस्थ नव्हते. पण मुद्रित माध्यमांच्या प्रतिनिधींपुढे सरकारचे प्रवक्ते अशी भूमिकाही अय्यरच पार पाडत असत. या सर्वांमधून राजकारणामध्ये यायची ऊर्मी अय्यर यांच्या मनात आली नसती तरच नवल आणि तो काळ असा होता, की अय्यर यांनी फक्त इच्छा व्यक्त करण्याचा अवकाश. 1989 मध्ये त्यांनी आपल्या सेवेचा राजीनामा दिला. प्रशासकीय सेवेत, विशेष करून पंतप्रधानांच्या कार्यालयात पाच वर्षे सेवा केलेली असल्याने स्पष्ट वक्ते असलेले अय्यर याच काळात काहीसे उद्धटही बनले. खासदार झाल्यानंतर तर हा उद्धटपणा फारच वाढला. त्यातूनच त्यांनी स्वतःची प्रतिमा वादग्रस्त बनवली. प्रशासकीय सेवेतून राजीनामा दिल्यानंतर त्यांची वर्णी राज्यसभेवर लागावी यासाठी स्वतः राजीव गांधी यांनी प्रयत्न केले होते. मात्र तोपर्यंत देशातील सत्तेची सूत्रे त्यांच्या हातातून निसटली होती आणि जयललिता यांच्यासारख्या सहकाऱ्यांनीही अय्यर यांना कडवा विरोध केला. त्यानंतर 1991 मध्ये अय्यर यांनी आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याचा निरोप राजीवना दिला आणि काही तासांतच राजीवजींचा दुर्दैवी अंत झाला. त्या सहानुभूतीचा परिणाम म्हणून अय्यर तब्बल दीड लाखांच्या मताधिक्याने लोकसभेत पोहोचले. अर्थात, 1996 मध्ये पराभव पत्करावा लागेपर्यंत अय्यर आणि जयललिता यांच्यातून विस्तव जात नव्हता, अशी स्थिती निर्माण झाली. याच काळात अय्यर यांचे जी. के. मूपनार, पी. चिदंबरम या तमीळ नेत्यांशीही फाटले आणि संपूर्ण राजकारणात ते एकाकी पडले. याच वेळेस थेट कॉंग्रेसबरोबर संबंध संपवून टाकण्याची घोषणाही त्यांनी केली होती. सोनिया गांधी यांचा राजकारणातील सक्रिय प्रवेश ही त्यांच्या दृष्टीने संजीवनी ठरली होती. अय्यर यांनी सीताराम केसरी यांच्यावर टीकास्त्र सोडीत मॅडमच्या "कॅबिनेट'मध्ये सहज प्रवेश मिळविला. त्यामुळे कॉंग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळताच, कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचा सहज समावेश झाला. पेट्रोलियम विभाग मिळाल्यानंतर अंदमान येथील ज्योतीच्या भोवती लावण्यात येणारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची वचने काढून टाकण्याचा प्रयत्न असो किंवा आखाती देशातून पाकिस्तानमधून इंधनासाठी पाइपलाइन टाकण्याचा विषय असो, त्यांची कारकीर्द सतत वादग्रस्त ठरली. त्यातूनच त्यांची उचलबांगडी क्रीडा व पंचायत राज मंत्रालयात झाली. या दोन्ही विभागांमध्ये त्यांना बिलकूल रस नाही. त्यामुळे आतापर्यंत कायम पंचतारांकित संस्कृतीमध्ये वावरणारे अय्यर खेड्यातील जनतेबाबत काळजी दाखवायला लागले तेव्हा काहीसे चेष्टेचाच विषय बनले. परवा आशियायी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यापेक्षा देशातील खेड्यापाड्यांमध्ये राहणाऱ्या युवकांना क्रीडा सुविधा कशा मिळतील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे जाहीरपणे सांगून त्यांनी कलमाडी यांच्या मनोरथाला सुरुंग लावला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या संयोजन समितीमध्ये आपल्याला स्थान न देण्याच्या कलमाडी यांच्या डावाला त्यांनी दिलेले ते उत्तर होते. वास्तविक दर वर्षाची अखेर गोव्यामध्ये साजरी करणाऱ्या या दोन मित्रांमध्ये हे टोकाचे मतभेद कसे, हाही प्रश्नच आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर भारताने यजमानपद गमाविल्यानंतरही ते आपल्या भूमिकेबाबत ठामच होते. आता या वादाचे नक्की काय परिणाम त्यांना भोगावे लागतात, याची चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे इतकेच. -------------------- पराग करंदीकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment