Friday, October 26, 2007
धीरुभाईंचा वारसदार
रिलायन्स आणि मुकेश अंबानी ही नावे चर्चेत आली, की त्याच्या बातम्या होतात. त्यांची संपत्ती असो किंवा ते स्वतःसाठी बांधत असलेले घर असो. मुकेश अंबानी या नावाला आता असे वलय लाभले आहे, की ते करीत असलेली प्रत्येक गोष्ट बातमीचा विषय ठरते. आता त्यांचा महिन्याला मिळणारा पगार हादेखील बातमीचा विषय ठरला आहे. वार्षिक पंचवीस कोटी रुपये हे त्यांचे वेतन आता चर्चेत आले आहे. इतकेच नव्हे, तर त्यांचे बंधू अनिल अंबानी यांच्यापेक्षा त्यांचे वेतन दहापट असल्यामुळे या चर्चेला आणखी एक विशेष महत्त्व लाभले आहे. रिलायन्सचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचे ज्येष्ठ चिरंजीव या नात्याने मुकेश अंबानी यांचा त्या कंपनीतील प्रवेश अपेक्षितच होता. धीरुभाई एडनमध्ये असतानाच मुकेशचा जन्म झाला. त्यानंतर धीरुभाई मुंबईत आले आणि रिलायन्सची उभारणी झाली. प्रारंभी चाळीमध्ये राहणारे कुटुंबीय त्यानंतर वेगाने श्रीमंत होत गेले; पण चाळीत असतानाचा साधेपणा मुकेश अंबानींच्या अंगात आजही असल्याचे त्यांचे निकटवर्ती सांगतात. मुंबई विद्यापीठातून "केमिकल इंजिनिअरिंग'मधील पदवीनंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी "एमबीए'ची पदवी संपादन केली. त्यानंतर 1981 मध्ये ते "रिलायन्स'मध्ये दाखल झाले. मुकेश अंबानी यांनी कंपनीत प्रवेश केला, तेव्हा "रिलायन्स' ही पॉलिस्टर कापड तयार करणारी एक कंपनी होती. धीरुभाई अंबानी एका ठराविक पद्धतीने आपला व्यवसाय वाढवीत होते; पण जागतिक बाजारपेठेत स्थान निर्माण करायचे असेल, तर फक्त कापड तयार करून चालणार नाही, हे मुकेश अंबानी यांनी ओळखले होते. फक्त कापड तयार करण्यापेक्षा पॉलिस्टर धागा तयार करण्यास "रिलायन्स'ने प्रारंभ केला. इतकेच नव्हे तर त्या पुढच्या काळामध्ये रिलायन्सने विविध क्षेत्रांमध्ये प्रवेश करून अग्रस्थान मिळविले. त्यामध्येही मुकेश अंबानींचा सिंहाचा वाटा होता. पाताळगंगा येथे उभारण्यात आलेला प्रकल्प ही मुकेश अंबानींच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना ठरली. संपूर्ण जगातील तज्ज्ञांनी, हा प्रकल्प उभारणीसाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागेल, असे सांगितले होते. मुकेश यांनी मात्र अठरा महिन्यांत हा प्रकल्प उभारून दाखवितानाच आपल्या नियोजन कौशल्याचे दर्शन भारतीय उद्योग जगताला घडविले. त्यानंतर जामनगर येथे पेट्रोलियम रिफायनरी उभारतानाही मुकेश अंबानी यांची धडाडी दिसून आली. वडिलांच्या निधनानंतर बंधू अनिल अंबानी यांच्याबरोबर त्यांचे मतभेद झाले. रिलायन्स उद्योगसमूहाची विभागणी झाली. या विभागणीनंतरही मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांची घोडदौड सुरूच आहे. विशेष करून त्यांच्या कंपनीला सापडलेले खनिज तेलाचे साठे आणि त्या आधारावर उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांची; तसेच मुंबई आणि नव्या मुंबईमध्ये तयार करण्यात येत असलेल्या विशेष आर्थिक क्षेत्राची चर्चा आता सुरू आहे. सहसा प्रसिद्धिमाध्यमांपासून दूर राहणाऱ्या मुकेश अंबानींचे दर्शन अलीकडच्या काळात विविध वाहिन्यांवरून होऊ लागले आहे. आपली प्रतिमा बदलण्याचा त्यांचा प्रयत्न जाणवण्याजोगा आहे. फोर्बस् मासिकाने यंदा जाहीर केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये मुकेश अंबानी 14 व्या क्रमांकावर होते. या घडीला भारतातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती असा लौकिक त्यांनी मिळविलेला आहे. आता वर्षाला पंचवीस कोटी रुपये वेतन घेणारे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते चर्चेत आहेत. धीरुभाई अंबानी यांचा वारसा अतिशय सार्थपणे चालविण्यामध्ये मुकेश यांनी यश मिळविले आहे. तसेच शेअर बाजारामध्ये आपल्या आयुष्याची पुंजी गुंतविणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारालाही त्यांनी वडिलांपेक्षा जास्त विश्वास दिला आहे. लौकिक अर्थाने त्यांनी कितीही यश मिळविले असले तरी त्यांच्याबाबत सामान्य गुंतवणूकदाराला वाटणारा विश्वास, हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. ------------------ पराग करंदीकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment