Friday, October 26, 2007

नव्या भूमिकेत अन्सारी

उपराष्ट्रपतिपदी महंमद हमीद अन्सारी विराजमान झाले आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सुरू असतानाच उपराष्ट्रपती कोण, अशी चर्चा सुरू झाली होती. सत्तारूढ कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांमध्ये एकमत होईल, अशी काही नावे चर्चेत होती; पण मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश कारत यांनी अन्सारी यांचे नाव सुचविले आणि त्यावर एकमत झाले. त्या वेळेस कुजबूज सुरू झाली, की कोण हे अन्सारी? अर्थात त्यात आर्श्‍चय वाटण्यासारखे नाही. कारण अन्सारी हे काही राजकारणी व्यक्तिमत्त्व नाही. सारे आयुष्य भारतीय परदेश सेवेमध्ये राजदूत म्हणून घालविल्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये ते सार्वजनिक जीवनामध्ये आहेत. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पश्‍चिम आशियातील पेचप्रसंगाची वेळ आली, की भारताला आठवण यायची ती अन्सारींचीच. अन्सारी राजकारणात नसले, तरी राजकारण त्यांना नवे नाही. त्यांचे आजोबा डॉ. एम. ए. अन्सारी यांनी 1927 मध्ये कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. अन्सारी यांच्या वडिलांनी त्यांच्या आजोबांच्या राजकीय सल्लागाराची भूमिका बजावली होती. मोतिलाल नेहरू यांच्या निकटवर्तीयांपैकी एक, अशीच त्यांच्या वडिलांची ओळख होती. असहकार चळवळीमध्ये अन्सारी कुटुंबाचा मोठा सहभाग होता. राजकारण हा आपला पूर्ण वेळ व्यवसाय नाही, हे ओळखून अन्सारी यांच्या वडिलांनी त्याच काळात नुकतेच मूळ धरत असलेल्या विमा क्षेत्रामध्ये त्यांनी नोकरी सुरू केली. या नोकरीमुळेच त्यांनी कोलकता आणि पुढे सिमल्याला स्थलांतरही केले. हमीद अन्सारींचे शिक्षणही त्यामुळे याच दोन ठिकाणी झाले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्येही त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळविली. सिमल्यामध्ये शाळेत असतानाच देश स्वतंत्र झाला आणि देशाची फाळणीही. त्या काळातील आठवणी अन्सारी यांच्यासमोर अजूनही आहेत. पाकिस्तानचे निर्माते महंमद अली जिना यांनी स्वतः पत्र पाठवून अन्सारी यांच्या वडिलांना पाकिस्तामध्ये येण्याचे निमंत्रण दिले आणि त्याच्यासोबत मोठ्या हुद्‌द्‌याच्या नोकरीचे नेमणूकपत्रही पाठविले होते; पण "आता या वयात देश बदलणे शक्‍य नाही,' असे सांगत त्यांनी आपला नकार कळविला. कोणत्याही स्थितीत भारतातच राहण्याचा निश्‍चय अन्सारी कुटुंबाने केला होता. 1961 मध्ये अन्सारी भारतीय परदेश सेवेमध्ये रुजू झाले. पश्‍चिम आशियातील घडामोडी हा त्यांचा पहिल्यापासूनच जिव्हाळ्याचा विषय होताच. सुदैवाने त्यांना नेमणुकाही प्रामुख्याने याच भागात मिळाल्या. संयुक्त अरब अमिराती, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया आणि इराण या चारही देशांमध्ये त्यांनी भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघामध्येही भारताचे कायम प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. केंद्र सरकारने 1984 मध्ये त्यांना "पद्मश्री'ने गौरविले. या सर्व प्रवासामध्ये अन्सारी यांनी आपल्यातील विद्यार्थी जपला. विशेष करून इराण हा त्यांच्या कायम जिव्हाळ्याचा विषय राहिला. यातूनच इराणवरील त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला संपूर्ण जगाने मान्यता दिली. 1979 मध्ये इराण मध्ये उठाव होऊन इस्लामी राजवट आल्यानंतरही भारताने या देशाबरोबर सौदार्हपूर्ण संबंध ठेवले पाहिजेत, असे मत त्यांनी आग्रहाने मांडले. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानमध्ये असताना, अमेरिकेच्या सूचनेनंतर भारताने आपले लष्कर इराकमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळेस जे. एन. दीक्षित आणि अन्सारी यांनी केलेल्या विरोधामुळे पंतप्रधानांनी तो निर्णय रद्द केला. निवृत्त झाल्यानंतर अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून, तसेच "ओएनजीसी' या सरकारी कंपनीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. अलिगड विद्यापीठामध्ये त्या वेळेस असलेले वातावरण तप्त होते. मात्र, अन्सारी यांनी आपले राजनैतिक कौशल्य पणाला लावून या विद्यापीठाची गाडी मार्गावर आणली. त्यानंतर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. गुजरातमधील 2002 च्या दंगलीनंतर विस्थापित झालेल्या निर्वासितांच्या छावण्यांची पाहणी करून केंद्र सरकारला अहवाल सादर करण्याचा निर्णयही त्यांनीच घेतला होता. आता मात्र अन्सारी यांना आपले सारे राजनैतिक कौशल्य राजकीय कामासाठी पणाला लावावे लागणार आहे. आतापर्यंत नेहमीच सुरक्षित चार भिंतीत राहून विचारवंतांची भूमिका निभावणारे अन्सारी सार्वजनिक आयुष्यातील त्यांची भूमिका कशी पार पाडतात, याबद्दल म्हणूनच औत्सुक्‍य आहे. ------- पराग करंदीकर

No comments: