Friday, October 26, 2007
विविध क्षेत्रांत विहरणारा राजकारणी
------ अस्सल मराठी माणसांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याचं नेतृत्व करणं, हे काही येरागबाळ्याचं काम नाही. घरटी विचारवंत असणाऱ्या पुण्याला आपल्याच वळणानं वाहतं ठेवताना भल्याभल्यांची भंबेरी उडाली आहे. मराठी गंधाशी घट्ट नाळ जुळवीत इथलं राजकारण आपल्या पंखांखाली ठेवण्याचं कौशल्य सुरेश कलमाडी यांनी गेली पंधरा वर्षे दाखविलं आहे.. मराठी मातृभाषा नसलेला हा माणूस महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीवर निर्विवाद वर्चस्व गाजवतो आहे. फक्त राजकारणच नव्हे, तर समाजकारण, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रावरही त्यांनी विलक्षण पकड बसविली आहे. उमेदीची वर्षे हवाई दलात वैमानिक म्हणून काम केल्यानंतर 1974 मध्ये ते पुण्यात स्थिरावले. शहराच्या मध्यवस्तीतील "पूना कॉफी हाऊस' हॉटेल निळूभाऊ लिमयांकडून विकत घेऊन त्यांनी बस्तान बसविले. तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यावर चप्पल भिरकावल्याने कलमाडी प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर ते युवक कॉंग्रेसचे अध्यक्षही झाले. तेव्हाच्या समाजवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे बोट धरून त्यांनी दिल्लीच्या राजकारणाचा "श्रीगणेशा' गिरवला. सन 1982 मध्ये राज्यसभेत खासदारपद मिळविताना कलमाडी यांनी संघटनकौशल्याची चुणूक दाखविली. त्यानंतर चार वेळा ते राज्यसभेचे खासदार झाले. कलमाडी यांनी याच दरम्यान क्रीडाक्षेत्रातही शिरकाव केला. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन केल्यानंतर त्यांनी भारतीय ऍथलेटिक्स महासंघाचे अध्यक्षपद पटकाविले. असे असले तरी पुण्याच्या राजकारणात 1990 पर्यंत कलमाडी यांना स्थान नव्हते. सन 1992 च्या लोकसभा निवडणुकीत बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले. त्यांना पक्षश्रेष्ठींचे आशीर्वाद लाभल्याने गाडगीळ पराभूत झाले. नेमक्या त्याच गोष्टीचा फायदा उठवीत कलमाडींनी गाडगीळ यांच्या ताब्यातील पुणे महापालिकेवरही नियंत्रण मिळविले. पुण्यातील आपल्या नेतृत्वाला राजमान्यता मिळविण्यासाठी कलमाडी यांनी राष्ट्रीय क्रीडास्पर्धेच्या संयोजनाचा पुरेपूर वापर केला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिलेल्या सर्वाधिकाराचा वापर करीत त्यांनी शासनातील खाचाखोचा माहीत करून घेतल्याच, पण त्याचबरोबर पुणे परिसरातील सर्व आमदार आणि नगरसेवकांनाही आपल्या पंखांखाली घेतले. राष्ट्रीय क्रीडास्पर्धेनंतर झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने सत्ता मिळविली आणि पुण्यातील कलमाडी यांच्या एकछत्री कारकिर्दीला प्रारंभ झाला. पुढे लोकसभा निवडणुकीत पुणेकरांनी त्यांना निवडून दिले. याच काळात कलमाडींनी क्रीडाक्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर स्वतःचे स्थान निर्माण केले. पुणे मॅरेथॉनला "पुणे फेस्टिव्हल'ची जोड देत त्यांनी पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातही प्रवेश केला. हा प्रवास सुरू असतानाच, श्री. पवार यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी पुणे विकास आघाडीची वेगळी चूल मांडली. या काळातही विरोधकांशी संधान साधत पुणे महापालिकेवरील नियंत्रण त्यांनी कायम ठेवले. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना व भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा मिळविणारे ते एकमेव अपक्ष उमेदवार होते. सख्ख्या भावाचे निधन झाल्यानंतरही केवळ कलमाडी यांच्यासाठी अटलबिहारी वाजपेयी तेव्हा पुण्यात प्रचाराचा समारोप करण्यासाठी आले होते. त्यांनी दिल्लीत किती वजन कमाविले होते, याचे हे निदर्शक होते. नेमक्या याच गोष्टीची चीड येऊन पुणेकरांनी त्यांना नाकारले. पण त्यानंतर राज्यसभेवर अपक्ष म्हणून त्यांनी 1998 मध्ये मिळविलेला विजय कॉंग्रेस नेतृत्वालाही चांगलाच झोंबला. कोणतीही गोष्ट भव्य स्वरूपातच करायची, त्याचा भरपूर गाजावाजा करायचा, यात कलमाडी यांचा हात कोणीही धरू शकत नाही. प्रत्येक गोष्ट आंतरराष्ट्रीय पातळीवरचीच असली पाहिजे, असा त्यांचा ध्यास असतो. यामुळे त्यांना अनेक वेळा चांगल्या गोष्टी करूनही टीकेचे धनी व्हावे लागले आहे. उद्योजक म्हणूनही त्यांनी चांगले बस्तान बसविले आहे. "मारुती', "बजाज' आणि "महिंद्र' या उद्योगसमूहांची देशातील सर्वांत मोठे वितरक असलेली कलमाडी यांची "साई सर्व्हिसेस' या कंपनीची वार्षिक उलाढाल पाचशे कोटी रुपयांच्या घरात आहे. क्रीडाक्षेत्रात कलमाडी हे नाव आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील संयोजक म्हणून घेतले जाते. कलमाडी कार्याध्यक्ष असलेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेचे 2010 मध्ये आयोजन करण्यासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यानंतर आशियाई व ऑलिंपिक स्पर्धांच्या आयोजनाचाही प्रयत्न करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. हे सर्व आकडे कलमाडी यांचे स्थान स्पष्ट करणारे आहे. असे असले तरीही पुण्यातील राजकारणावरील कलमाडी यांचे लक्ष कधीही कमी होत नाही. आजही जगाच्या पाठीवर कोठेही त्यांचा मुक्काम असला, तरीही पुण्यातील वृत्तपत्रांची कात्रणे रोज सकाळी त्यांच्यापर्यंत पोचविली जातात. पुण्यात होणाऱ्या प्रत्येक राजकीय घटनेची नोंद त्यांच्यापर्यंत पोचविली जाते. कोठेही असले तरी महापालिकेतील अगदी लहान लहान निर्णयही त्यांच्या संमतीशिवाय होत नाहीत. नुकत्याच झालेल्या कॉंग्रेसच्या उमेदवार वाटपातही कलमाडी यांनी त्यांच्या समर्थकांना स्थान मिळवून देण्यात यश मिळविले. येणाऱ्या काळात पुणे फेस्टिव्हल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यांचे आयोजन करून त्या क्षेत्रावरील आपली पकड कायम ठेवण्याचाच त्यांचा प्रयत्न असेल. ---------------------------- पराग करंदीकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment