परवा कणकवलीच्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना ज्येष्ठ अभिनेत्या आणि यंदाच्या संमेलनाध्यक्षा लालन सारंग यांनी पुन्हा एकदा नाट्यनिर्मितीसाठी सर्रास सरकारी अनुदान नकोच, या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. अर्थात काही दिवसांपूर्वी त्यांच्या याच प्रकारच्या उद्गारांवरून नाट्यनिर्मात्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. त्याच वेळेस लालन सारंग यांचा स्वभाव माहिती असलेल्या अनेक नाट्यरसिकांनी संमेलनाच्या रंगमंचावरून त्या या सर्व टीकेला सडेतोड उत्तर देणार, अशी अटकळ बांधली होतीच आणि घडलेही तसेच. त्यांनी आपल्यावरील टीकेला उत्तर तर दिलेच; पण टीकाकारांना त्यांची जागा दाखवायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. लालन सारंग याचा संपूर्ण प्रवासच अशी वादळे अंगावर घेत झालेला आहे. कधी ही वादळे तथाकथित संस्कृतिरक्षकांनी केलेली होती, तर कधी त्यांच्याच व्यवसायातील काहींनी; पण त्या प्रत्येक वादळाचा सामना करायचे धाडस त्यांनी दाखविले. फक्त सामनाच करायचा नाही, तर सर्व शक्तीनिशी तो जिंकायचा, याची सवयच त्यांना झाली आहे. त्यामुळे त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्वच वादळी बनून गेले आहे. पैंगणकर कुटुंबामध्ये जन्म झालेल्या या मुलीचे नाव "लालन' असे ठेवण्यात आले. वास्तविक हे नाव कधीच फारसे प्रचलित नव्हते; पण वाचनाची आवड असलेल्या त्यांच्या वडिलांनी एका कादंबरीतील बैरागिणीच्या नावावरून तेच नाव आपल्या मुलीला दिले. तेव्हापासूनच बहुधा या मुलीला वादळाचाच सामना करावा लागणार, हे ठरलेले होते. आर्थिकदृष्ट्या अतिसामान्य असलेल्या या कुटुंबातील आईवडिलांनी माया करण्यात मात्र कोणतीही कसूर केली नाही, असे त्यांनीच स्वतः नोंदवून ठेवले आहे. त्यानंतरचे शिक्षण आणि मुंबईसारख्या महानगरीमध्ये स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी केलेली टायपिस्टची नोकरी, यामध्ये वेगळे काहीच नव्हते. पण याच प्रवासात कुठेतरी अपघाताने त्या रंगभूमीवर आल्या आणि तिथल्याच बनून गेल्या. पुढे कमलाकर सारंग यांच्यासारख्या अवलिया कलाकाराशी जुळलेले मैत्र आणि त्यातून सुरू झालेला प्रवास त्यांनी आपल्या "जगले जशी' या पुस्तकात नोंदवून ठेवला आहे. अर्थात हा प्रवास फक्त त्यांचा नाही, तर तो कमलाकर सारंगांचाही आहे. त्याचप्रमाणे कमलाकर सारंग यांच्या "बाईंडरचे दिवस' हे पुस्तकही या दोघांच्या जिद्दीने पूर्ण केलेल्या प्रवासाचेच वर्णन आहे. बाईंडरच्या काळात समाजातील अनेकांकडून आलेले विचित्र अनुभव, संस्कृतिरक्षकांकडून मिळालेल्या धमक्या आणि या सर्वांविरुद्ध थेट उच्च न्यायालयात जाऊन दिलेला लढा, या सर्वांचा प्रवास थक्क करून टाकायला लावतो. अर्थात रंगभूमीवर त्यांनी सादर केलेली प्रत्येक भूमिका नाट्यरसिकांच्या चर्चेचा विषय ठरली. "सखाराम बाईंडर', "जंगली कबूतर' यासारख्या व्यावसायिक नाटकांप्रमाणे "सूर्यास्त', "रथचक्र', "कमला', "खोल खोल पाणी' यासारख्या नाटकांमधील गंभीर व्यक्तिरेखाही त्यांनी तितक्याच समर्थपणे साकारल्या आहेत. रंगभूमीवरील अष्टपैलू अभिनेत्री, अशीच त्यांची ओळ ख आहे. अर्थात फक्त मराठी रंगभूमीवरच नाही, तर हिंदी आणि गुजराती रंगभूमीवरही त्यांनी तितक्याच लोकप्रिय भूमिका साकारल्या आहेत. रंगभूमीवर कलाकार म्हणून वावरल्यानंतरही त्या समाधानी नाहीत. आपण सादर केलेल्या भूमिकांच्यामागील आपला विचार, त्यासाठी केलेले कष्ट आणि त्यातून समृद्ध झालेले आपले अनुभवविश्व, त्यांनी "मी आणि माझ्या भूमिका' या एकपात्री कार्यक्रमातून साकारल्या. मराठी रंगभूमीवरील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असावा. त्यानंतर वृत्तपत्रातून सदरांचे लिखाण करण्यामध्येही त्यांनी आघाडी घेतली. याच्याचबरोबर मुंबई आणि पुण्यामध्ये स्वतःची बुटिक स्थापन करून आपल्यातील उद्योजिकाही त्यांनी जगासमोर आणली आहे. आपल्या रोखठोक स्वभावाबद्दल त्या प्रसिद्ध आहेतच. त्यांची भाषा, त्यांची देहबोली हे सर्व स्वभावाला जुळणारेच आहे; पण जगाने दिलेल्या अनुभवांमुळे त्या अधिक परखड झाल्या आहेत, असे म्हटले तर गैर ठरणार नाही. कोठेही गुंतून न राहता, सतत काही तरी वेगळे करण्याची त्यांची धडपड आजही कायम आहे. नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून रंगभूमीच्या भल्यासाठी काही तरी घडावे, अशी कायमच अपेक्षा केली जाते. संमेलनाच्या अध्यक्षांकडून त्यापेक्षा अधिक अपेक्षा असते. लालन सारंग यांच्या भाषणातून त्यांचा रोखठोकपणा वगळला, तरीही रंगभूमीबद्दल आतून वाटणारी आस्थाच प्रगट झाली आहे. पुढचे वर्षभर अशाच पद्धतीने त्यांचा प्रवास असेल, यात कोणालाच शंका नाही. त्यासाठी त्यांना शुभेच्छा.
----------------------------- पराग करंदीकर
Thursday, October 25, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment