Thursday, October 25, 2007
लग्नाचा "इव्हेंट' करणारे जोडपे -
एखाद्या हॉलिवूडमधील अभिनेत्रीने भारतीय माणसाशी लग्न करणे, ही एकच गोष्ट अनेक भारतीयांच्या दृष्टीने औत्सुक्याचा विषय ठरते. गेल्या आठवड्यामध्ये पार पडलेला लिझ हर्ले आणि अरुण नायर यांचा विवाह हादेखील असाच औत्सुक्याचा आणि विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरला आहे. या दोघांबाबत सर्वसामान्य भारतीयांना फारशी माहिती नाही. लिझ ही अभिनेत्री असली, तरी तिचे गाजलेले चार चित्रपट कोणते याचे उत्तर चटकन सांगणारे अभावानेच सापडतील. तीच गोष्ट अरुण नायरच्या बाबतीतही आहे. तरीदेखील या दोघांचे लग्न भारतीयांच्या दृष्टीने औत्सुक्याचा विषय ठरले आहे. या दोघांची कारकीर्दही अशीच आहे. लिझ म्हणजेच एलिझाबेथ ही ब्रिटिश सैन्य दलातील एका अधिकाऱ्याची मुलगी. शाळेत जात असतानाच लिझ "बॅले' शिकायला जाऊ लागली. बाराव्या वर्षी तिला नृत्य शिकण्यासाठी शिष्यवृत्तीही मिळाली; पण त्यामध्ये तिची प्रगती यथातथाच होती. पुढे अभिनेत्री होण्याचे तिने तेव्हाच ठरविलेच होते. कॉलेजमध्ये असताना ती लोकांसमोर आली, ती "पंक' म्हणून. त्यानंतर इंग्लडमधील विन्चेस्टरमधील एका स्थानिक दैनिकाने घेतलेल्या सौंदर्यस्पर्धेत ती पहिली आली आणि मॉडेलिंगचे क्षेत्र तिच्यासाठी खुले झाले. त्यानंतर इंग्लडमधील दूरचित्रवाणी मालिकांमधून ती चमकू लागली आणि पुढे काही चित्रपटांमधूनही ती चमकली. 1992 मध्ये "पॅसेंजर 57'ने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. 1994 मध्ये लिझ गाजली ती तिच्या वेशभूषेमुळे. लिझला एका सौदर्यंप्रसाधनाच्या प्रसिद्ध कंपनीने 1995 मध्ये करारबद्ध केले. मग तिने मागे वळून पाहिले नाही. गेली तेरा वर्षे हा करार कायम आहे. संपूर्ण जगभर या उत्पादनांबरोबरच तिचेही नाव पोचले आहे. याच दरम्यान तिचे प्रसिद्ध अभिनेता ह्यू ग्रॅंटशी असलेले प्रेमसंबंधही गाजले. या दोघांनी एक कंपनी काढून काही चित्रपटांची निर्मितीही केली. 2001 मध्ये हे संबंध संपले; पण 2002 मध्ये लिझने एका मुलाला जन्म दिला. त्याचा पिता कोण यावरूनही प्रसिद्धिमाध्यमांमध्ये मोठे वादळ उठले होते. सातत्याने आंतरराष्ट्रीय प्रवास करणारा एक गुलछबू माणूस हीच अरुण नायरची ओळख आहे. मुंबईत जन्म झालेल्या आणि त्यानंतर आपल्या जर्मन आईच्या तालमीत तयार झालेल्या अरुणचे व्यक्तिमत्त्व कोणालाही भुरळ घालणारे आहे. अरुणची आई मोठी उद्योजक आहे. अनेक भाषांवर त्याचे असलेले प्रभुत्व हीदेखील त्याची जमेची बाजू ठरावी. अकरा वर्षांपूर्वी व्हॅलेंटिना पेड्रोनी या मॉडेलबरोबर मिलानमध्ये त्याची भेट झाली. त्यानंतर चार वर्षे जगभर फिरल्यानंतर हे दोघे विवाहबद्ध झाले. व्हॅलेंटिना मुंबईत आली खरी; पण हे संबंध फारसे टिकले नाहीत. पॅरिस येथील "फॅशन शो'मध्ये अरुण आणि लिझ एकमेकांच्या हातात हात घालून फिरत असलेले छायाचित्र प्रसिद्ध झाले. त्यानंतर हे प्रकरण घटस्पोटापर्यंत पोचले. या घटस्फोटाला होत असलेल्या विलंबामुळेच लिझ आणि अरुणचा विवाह काही काळ लांबणीवरही पडला होता. तीन मार्चला या दोघांनी लंडनमध्ये विवाह केला, आणि त्यानंतर भारतात येऊन "हिंदुस्थानी' पद्धतीने ते गेल्या आठवड्यात विवाहबद्ध झाले. आपले लग्न हादेखील एक "इव्हेंट' आहे, असे समजून त्याच्या प्रसिद्धीचे हक्कही विकून त्यांनी सर्वांनाच चकित केले. भारतीय प्रसारमाध्यमांनीही चाळीशी उलटलेल्या जोडप्याच्या दुसऱ्या लग्नाचा हा "इव्हेंट' घरोघर पोचवत या जोडप्याचा प्रसिद्धीचा उद्देश पूर्ण केला! ------ पराग करंदीकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment