Tuesday, July 1, 2008

माहिती क्रांतीचा नायक

विसाव्या शतकाच्या अखेरीस झालेल्या माहिती तंत्रज्ञान क्रांतीचा एक अग्रदूत कोण, असा प्रश्‍न विचारल्यास एक नाव चटकन पुढे येते. ते म्हणजे- बिल गेट्‌स. संगणकाच्या सार्वत्रिकीकरणात त्यांचा वाटा नक्कीच मोठा आहे. त्यांच्या या कार्याची मोहर येत्या काळातही कायम असणार. आज वयाच्या अवघ्या 52 व्या वर्षी बिल त्यांच्या लाडक्‍या "मायक्रोसॉफ्ट'मधून निवृत्त होत आहेत. या पुढे ते कंपनीचे नामधारी प्रमुख राहणार असले, तरी "मायक्रोसॉफ्ट'चे सुकाणू त्यांच्या हातात नसेल.
बिल गेट्‌स यांचा जन्म 28 ऑक्‍टोबर 1955 चा. त्यांचे वडील विल्यम एच. गेट्‌स हे एक नामांकित वकील. सिऍटलमधील हे एक नामांकित आणि संपन्न घराणे. आपल्या तीनही मुलांना उत्तम शिक्षण मिळण्याकडे विल्यम यांचे विशेष लक्ष होते. बिल शालेय अभ्यासामध्ये हुशार होताच; पण अनेकदा त्याचे "लॉजिकल थिंकिंग' वडिलांसह सर्वांना थक्क करून टाकणारे होते. शाळेत असतानाच संगणकाची ओळख करून घेण्याची संधी त्याला मिळाली आणि या संगणकाने त्याला झपाटून टाकले. वयाच्या तेराव्या वर्षी त्याने आपल्या आयुष्यातील पहिला "प्रोग्रॅम' तयार केला. आपल्या सिऍटलमधील "लेकसाईड स्कूल'मधील विद्यार्थ्यांचे वेळापत्रक तयार करण्याचा हा प्रोग्रॅम होता. "बेसिक' भाषेत त्याने केलेल्या या कामगिरीने शाळेतील शिक्षकही थक्क झाले होते. अर्थात शाळेला मिळालेला संगणक देणगीचा होता. पुढे सुटीमध्ये त्याने आपल्या मित्रांच्या साहाय्याने पुन्हा संगणक वापरण्यास प्रारंभ केला. त्या वेळचे संगणक खोलीभर आकाराचे होते. साहजिकच संगणक घरी आणण्यापेक्षा तो असेल तेथे जाऊन त्याचा वेळ विकत घेण्याची पद्धत होती. बिलने हुशारीने संगणकातील वेळ मोजणारे घड्याळ बिघडवून आपला वापर किमान वेळ झाला असल्याचे "कौशल्य' दाखवून दिले आणि त्याच्यावर तो संगणक वापरण्याची बंदीच आली.
पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो हॉवर्डमध्ये दाखल झाला. या विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेमध्ये त्याने 1600 पैकी 1590 गुण मिळवून विक्रमच केला होता. विद्यापीठातील त्याचा सर्व वेळ संगणकावर वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रोग्रॅम तयार करण्यातच जायचा. आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचे आहे, हे त्याला गवसले नव्हते. याच दरम्यान "अल्गोरिथम'वर एक शोधनिबंध सादर करण्यात त्याने यश मिळविले. या वेळेस "इंटेल'ने बाजारात आणलेल्या संगणकामध्ये असलेली "चीप' दोनशे डॉलरला उपलब्ध झाली होती. या घटनेने मात्र त्याला विचार करण्यास भाग पाडले.
"मायक्रोसॉफ्ट'ची स्थापना
त्यातूनच पॉल ऍलेन या मित्राबरोबर "मायक्रोसॉफ्ट' या कंपनीची 1975 मध्ये बिल यांनी स्थापना केली. त्याच वर्षी "मायक्रोसॉफ्ट'ने, संगणक हा छंद म्हणून बघणाऱ्यांसाठी नवा संगणक बाजारात आणला. 1980 मध्ये "आयबीएम'ने मायक्रोसॉफ्टला सहकार्याचा हात मागितला. यातूनच 1981 मध्ये "आयबीएम'चा संगणक आणि "मायक्रोसॉफ्ट'ची "एमएस डॉस 1.01' ही प्रणाली बाजारात आली. अर्थात हे फार काळ चालले नाही. फक्त "आयबीएम'ने तयार केलेल्याच नव्हे, तर कोणत्याही कंपनीच्या संगणकावर वापरता येईल, अशी प्रणाली आपण तयार केली पाहिजे, या ध्यासाने बिल गेट्‌स आणि त्याच्या सहकाऱ्यांना झपाटले. त्यातूनच 1985 मध्ये "विंडोज 1.0' ही प्रणाली जन्माला आली. ही "खिडकी' पुढच्या काही वर्षांत माहिती तंत्रज्ञानाचे संपूर्ण जगच ताब्यात घेईल, असे त्या वेळेस खुद्द त्यांच्या निर्मात्यांनाही वाटले नव्हते. पण त्यानंतरचा काळ हा "विंडोज'चा होता. हा प्रवास सोपा नव्हता. त्यात त्यांनी अनेक कंपन्यांशी करार केले, मोडले. त्याचप्रमाणे प्रसंगी आपल्याला योग्य; पण लोकांना बेधडक वाटेल अशा पद्धतीने कंपनी वाढविली. त्यासाठी अमेरिकेच्या सत्ताधाऱ्यांबरोबरही न्यायालयात लढाई दिली. 1986 मध्ये मायक्रोसॉफ्टने शेअर बाजारातून आपले भांडवल वाढविण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच दिवशी त्याच्या शेअरची किंमत सात डॉलरवरून 28 डॉलरवर गेली. बिल यांच्याकडे कंपनीचे 45 टक्के शेअर होते आणि या घटनेने त्यांना थेट जगातील श्रीमंत व्यक्तींमध्येच नेऊन बसविले. वयाच्या 31 व्या वर्षी ते स्वतःच्या कष्टाने अब्जाधीश बनले.
या काळात समाजासाठी काही तरी केले पाहिजे या भावनेतून त्यांनी आपल्या वडिलांच्या नावाने एक संस्था सुरू केली. त्यानंतर सन 2000 मध्ये त्यांनी बिल आणि मेलेंडा गेट्‌स फाउंडेशनची स्थापना केली. गेट्‌स यांनी "मायक्रोसॉफ्ट'मधून भरपूर पैसा कमाविला असला तरीही तो त्यांनी अनेक उद्योगांमध्ये गुंतविला. तेजीचे वातावरण असल्याने या गुंतवणुकींनी त्यांना आणखी श्रीमंत केले. "विंडोज'च्या नव्या आवृत्त्या बाजारात येतच गेल्या आणि त्याचबरोबर त्यांची वैयक्तिक संपत्तीही वाढत गेली. याचदरम्यान त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या कार्यकारी अधिकारी पदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 45 व्या वर्षी म्हणजेच सन 2000 मध्ये त्यांनी घेतलेल्या या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
त्यानंतर आठ वर्षांनी आता ते निवृत्त होत आहेत. या पुढे आपला सर्वाधिक वेळ गेट्‌स फाउंडेशनच्या कामासाठी असेल, असे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. 27 जून 2008 हा त्यांचा "मायक्रोसॉफ्ट'च्या कार्यालयातील अखेरचा दिवस ठरला आहे. यंदाच्या आकडेवारीनुसार श्रीमंतीत त्यांचा जगात तिसरा क्रमांक लागतो. तरीही त्यांनी थांबायचा निर्णय घेतला आहे. आयुष्यात अनेकांना नक्की कोठे थांबायचे हेच न कळल्याने त्यांची काय अवस्था होते हे आपण पाहतोच. त्याचमुळे बिल गेट्‌स यांचे हे वेगळेपण उठून दिसते.
--------------
पराग करंदीकर
parag.karandikar@esakal.com
--------------

No comments: