Saturday, June 14, 2008

रणबक्षीचा "धक्का'

परवा अचानक "रणबक्षी' या भारतातील सर्वात मोठ्या औषध निर्माण करणाऱ्या कंपनीने पत्रकार परिषद घेत आता आपल्यावर जपानच्या दाईची संकायो या कंपनीचे नियंत्रण राहील, असे जाहीर केल्याने भारतीय उद्योगक्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. इतके दिवस फक्त भारतातील टाटा, रिलायन्स आणि इतर कंपन्या परदेशातील कंपन्या कशा विकत घेत आहेत, हे ऐकण्याची किंवा वाचण्याची सवय असलेल्या भारतीय ग्राहकांना हा एक धक्काच होता. त्याचबरोबर भारत आता खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर पोहोचला असून येथील उद्योगांमध्येही आता परदेशातील मोठ्या कंपन्यांना रस वाटू लागला असल्याचेच हे निदर्शक आहे. अर्थात भारतीय औषध क्षेत्रामध्ये रणबक्षी हे सर्वांत मोठे नाव होते आणि या पुढेही राहणार आहे. "रॅनबॅक्‍सी' या उच्चाराने औषधक्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या या कंपनीची वाटचालही तशीच आश्‍चर्य वाटावी अशी आहे.
गेल्या पंधरा वर्षांमध्ये या कंपनीने प्रगतीचे सर्व विक्रम मोडले आहेत, असे म्हटले तर गैर ठरू नये. या कंपनीची मुर्हूतमेढ रोवली गेली 1937 मध्ये. जपानच्याच शिंगोई या औषध कंपनीचे वितरक म्हणून रणजितसिंग आणि गुरुबक्षसिंग यांनी एकत्र येऊन काम करण्यास प्रारंभ केला. आपल्या कंपनीचे नाव काय ठेवायचे यावर एकमत होईना, म्हणून दोघांच्या नावातील "रण' आणि "बक्ष' अशी अक्षरे घेऊन नवे नाव तयार करण्यात आले. प्रारंभीच्या वर्षात या नव्या कंपनीने काही हजार रुपयांची उलाढाल करण्यात यश मिळविले. त्या काळात काही हजारांची उलाढाल ही आजच्या काही कोटींच्या उलाढालीइतकीच समजली जायची. दिल्लीच्या दवा बाजारमध्ये या कामकाजाची दखलही घेण्यात येऊ लागली होती. याच काळात भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि पाकिस्तानमधून हजारो निर्वासित येथे आले. त्यांच्यातच रणजितसिंग यांचे मावसभाऊ भाई मोहनसिंग हेही होते. मोहनसिंग यांना प्रारंभी या उद्योगात सामावून घेण्यात आले. कालांतराने मोहनसिंग यांच्याकडेच या कंपनीची सूत्रे गेली. त्यांनी ही कंपनी अडीच लाख रुपयांमध्ये विकत घेतली, असे सांगितले जाते. पण हा व्यवहार मान्य नसलेल्या गुरुबक्षसिंग यांनी त्यांच्यावर न्यायालयामध्ये दावा दाखल केला. त्या वेळेपासून रणबक्षी आणि न्यायालयीन दाव्यांचे नाते "अतूट' बनले.
मोहनसिंग यांच्याकडून त्यांचे चिरंजीव परविंदरसिंग यांनी 1967 मध्ये कंपनीचे सुकाणू आपल्या हाती घेतले. त्यांच्या कारकिर्दीत कंपनीची भरभराट होऊ लागली. भारतामध्ये औषधनिर्मितीवर अनेक निर्बंध असण्याचा तो काळ होता. किंबहुना औषधनिर्मिती हे सरकारचेच काम असून खासगी कंपन्यांनी त्यामध्ये ढवळाढवळ करू नये, असे सरकारी धोरणही होते. या धोरणाला विरोध करण्यामध्ये परविंदरसिंग आघाडीवर होते. याच कालावधीमध्ये रणबक्षीमध्ये संशोधनाचे कामही सुरू झाले होते. मात्र त्याचबरोबर परदेशामध्ये झालेल्या संशोधनांचे भारतापुरते हक्क विकत घेऊन नवी औषधे बाजारात आणण्यामध्येही त्यांचा पुढाकार होता. इटालियन कंपनीबरोबर सर्वप्रथम त्यांनी करार केला. पुढे सरकारी नियम बदलल्यामुळे रणबक्षीने दिल्लीतील ओखला येथे स्वतःचा कारखाना सुरू करून या औषधांचे पॅकेजिंग सुरू केले. या काळात कंपनीची उलाढाल एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती.
मालविंदर मोहन आणि शिवेंद्र मोहन यांनीही आपल्या वडिलांबरोबरच या कंपनीमध्ये कामास प्रारंभ केला. नवीन पिढी दाखल झाल्यानंतर प्रगतीची नवी क्षितिजे खुणावू लागली आणि विस्ताराचा वेगही प्रचंड वाढला. याच सुमारास म्हणजे 1991 मध्ये भारताने आर्थिक सुधारणा केल्या आणि औषधनिर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांनी त्याचा लाभ उठविला. 1988 मध्ये अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश केलेल्या रणबक्षीने त्यानंतर त्या बाजारामधील आपली पतही वाढविली. आज रणबक्षीच्या उत्पन्नातील 28 टक्के वाटा अमेरिकेतील बाजारपेठेतून येतो. 1990 मध्ये रणबक्षीने आपल्या नावावर अधिकृतपणे पहिले पेटंट मिळविले. 1993 मध्ये रणबक्षीने चीनच्या बाजारात प्रवेश केला. नव्या शतकाच्या प्रारंभी बायर या कंपनीचा काही भाग विकत घेण्यात रणबक्षीने यश मिळविले. याच वर्षी अमेरिकेतील कारभार दहा कोटी डॉलरवर नेण्यातही त्यांना यश आले. 2004 मध्ये एक अब्ज डॉलरचा व्यवसाय करणारी पहिली भारतीय कंपनी म्हणून रणबक्षीचा गौरव करण्यात आला. गेल्या सात वर्षांत रणबक्षीने विविध देशांतील सुमारे पंधरा छोट्यामोठ्या कंपन्या विकत घेतल्या, तर मोठ्या कंपन्यांबरोबर करार करून वैविध्य वाढविले.
या सर्व घोडदौडीनंतर निश्‍चितच रणबक्षीकडून वेगळ्या अपेक्षा ठेवल्या जात होत्या. शेअर बाजारामध्ये रणबक्षीच्या समभागांची किंमत वाढतच होती; पण त्याचबरोबर कंपनीवरील कर्जाचा बोजाही वाढत होता. विशेष करून परविंदरसिंग यांच्याकडून कंपनीची सूत्रे नवीन पिढीकडे गेल्यानंतर आर्थिक बाजूकडे फार लक्ष दिले गेले नाही किंवा वेगाने वाढण्याच्या नादात त्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले असल्याची चर्चा शेअर बाजारात सुरू झाली होती.
या सगळ्या पार्श्‍वभूमीवर अचानक पत्रकार परिषद घेऊन मालविंदरमोहन सिंग यांनी कंपनीतील आपले समभाग विकत असल्याची घोषणा करून सर्वांना धक्का दिला. या पुढील पाच वर्षे तेच या कंपनीचे अध्यक्ष राहणार असले, तरीही कंपनीच्या भांडवलातील 50.1 टक्के वाटा दाईचीने घेतला आहे. या पुढे कंपनीच्या ध्येयधोरणामध्ये कोणताही बदल होणार नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला असला तरीही त्याबाबत ठामपणे कोणीच सांगू शकणार नाही. त्यामुळेच भारतीय उद्योगांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे. मालविंदरमोहन सिंग यांनी जपानमधील दाईचीचाच पर्याय निवडला असल्याने रणबक्षीबाबत एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. अर्थात कोणत्याही प्रवासामध्ये एक वर्तुळ पूर्ण झाले की त्यानंतर मोठ्या वर्तुळात प्रवेश करणे अपेक्षित असते. ते करण्यात रणबक्षी यशस्वी होणार का, याचे उत्तर येणारा काळच देईल.
----------
parag.karandikar@esakal.com

No comments: